जिल्ह्यातील आरोग्य सेविकांचे धरणे
By admin | Published: October 15, 2015 02:59 AM2015-10-15T02:59:23+5:302015-10-15T02:59:23+5:30
आरोग्य सेविकांना अटक प्रकरणी डॉ.मंगला उईके आणि कळंब ठाणेदारावर कारवाई करण्यात यावी,
यवतमाळ : आरोग्य सेविकांना अटक प्रकरणी डॉ.मंगला उईके आणि कळंब ठाणेदारावर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. आरोग्य सेविकांवर खोटे आळ घेण्यात आले. आरोग्य अधिकारी आणि ठाणेदारांमुळे आरोग्य सेविकांवर संकट ओढवले आहे. या प्रकरणात आरोग्य अधिकारी आणि ठाणेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कामाचे तास ठरवून देण्यात यावे, डॉक्टर आणि नर्सेसवर होणारे हल्ले रोखण्यात यावे आदी मागण्यांसाठी आयोजित धरणे कार्यक्रमात जिल्ह्यातील शेकडो आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.
तत्कालीन प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मंगला उईके यांच्या विरोधात गंभीर तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या. त्याची चौकशी झाली मात्र कारवाई करण्यात आली नाही. १२ ते २४ वर्षे कालबध्द पदोन्नतीचे प्रकरणे रखडली आहे. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी, भविष्य निर्वाह निधी अद्यापही भेटला नाही. अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना खाते क्रमांक देणे, वेतनातून कपात झालेली दहा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणे, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना दरमहा १ तारखेला वेतन अदा करावे, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
धरणे आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, जिल्हाध्यक्ष मधुकर सोनवणे, राजेंद्र बैरागी, लक्ष्मण माने, ज्ञानेश्वर गौरकार, सिध्दार्थ तेलतुंबडे, अजय वासनिक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)