डोंगरखर्डा मुक्कामी आमदारांची आश्वासने
By admin | Published: May 21, 2016 02:29 AM2016-05-21T02:29:45+5:302016-05-21T02:29:45+5:30
रुग्णवाहिकेत डिझेलसाठी पैसे मागितल्यास कारवाई करू, अपंगांच्या नाव नोंदणीच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल,
नागरिकांचे प्रश्न जाणले : १३ विभागाचे कर्मचारी उपस्थित
निश्चल गौर डोंगरखर्डा
रुग्णवाहिकेत डिझेलसाठी पैसे मागितल्यास कारवाई करू, अपंगांच्या नाव नोंदणीच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल, जलशुद्धीकरण यंत्राचा प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावू, मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवू, अवैध धंदे नियंत्रणात आणू यासह इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार डॉ. अशोक उईके यांनी डोंगरखर्डा मुक्कामी दिले. यावेळी विविध १३ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
१९ मेच्या रात्री आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात आमदारांसह विविध विभागाचे अधिकारी मुक्कामी होते. रात्री २ वाजतापर्यंत नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. जागेवरच सोडविता येणाऱ्या समस्या तत्काळ निकाली काढण्यात आल्या. ११५ तक्रारींचे निवेदन ग्रामस्थांकडून यावेळी आमदारांना देण्यात आले. तहसील, पंचायत समिती, वनविभाग, विद्युत कंपनी आदी विभागांसंबंधी या तक्रारी होत्या.
गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याकडे महिलांनी आमदार आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. पाणीपुरवठा योजनेवरील जलशुद्धीकरण यंत्र, पांदण रस्ते मोकळे करणे, विभक्त कुटुंबांना रेशन कार्ड, गटारं, सिमेंट रस्ते, कर्जाचे पुनर्गठन आदी प्रश्नांवर चर्चा झाली. वनविभागाकडून वृक्ष लागवड, घरकूल हप्त्याचा लाभ, अपंगांना सायकलींचे वाटप आदी बाबींवर चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
शुक्रवारी सकाळी आमदारांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी मेटीखेडा येथील रुग्णवाहिकेत रुग्णांकडूनच डिझेल टाकून घेतले जाते किंवा पैशांची मागणी होते, अशी तक्रार केली. यावर आमदारांनी यापुढे कुणी असा प्रकार केल्यास कारवाई केली जाईल, असे ठणकावले. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. डोंगरखर्डाच्या विकासासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. डोंगरखर्डाचा कायापालट करू, असा विश्वास आमदारांनी यावेळी दिला.
डोंगरखर्डाच्या विकासाकरिता लोकप्रतिनिधींचे सहकार्य अपेक्षित आहे. आमदार डॉ. अशोक उईके यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. गावकऱ्यांचे त्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील, असे सरपंच निश्चल ठाकरे यांनी यावेळी सांगितले. उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी मनोहर नाल्हे, कृषी अधिकारी के.बी. आठवले, वीज अभियंता राऊत, विनोद चव्हाण, शाखा अभियंता मनोहर शहारे, वनपरिक्षेत्र अधिकारी वानखेडे या अधिकाऱ्यांसह सरपंच निश्चिल ठाकरे, उपसरपंच देवानंद वरफडे आदींची यावेळी उपस्थिती होती.