चार हजार हेक्टर महसूल जमिनीचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: August 27, 2016 12:57 AM2016-08-27T00:57:33+5:302016-08-27T00:57:33+5:30
तालुक्यातील ई-क्लासच्या ४ हजार १९१.१९ हेक्टर जमिनीची काय स्थिती आहे याबाबत तहसीलदारांनी तलाठ्यांकडे अहवालाची मागणी केली.
दप्तर दिरंगाई : तलाठी रजिस्टरमध्ये एकाही अतिक्रमणाची नोंद नाही
महागाव : तालुक्यातील ई-क्लासच्या ४ हजार १९१.१९ हेक्टर जमिनीची काय स्थिती आहे याबाबत तहसीलदारांनी तलाठ्यांकडे अहवालाची मागणी केली. परंतु तलाठ्यांकडून अहवाल निरंक येत असल्याने या जमिनीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे. या जमिनीवर अतिक्रमण वाढत असताना तलाठ्यांकडून निरंक अहवाल येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
माळकिन्ही, काळी, टेंभी, नांदगव्हाण येथील नागरिकांनी महसूलच्या ई-क्लास जमिनीची मागणी केली आहे. साधारण २०० हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे नागरिकांनी केलेल्या मागणीवरून लक्षात येते. अतिक्रमण केलेल्या जमिनी त्यांना नियमित करून हव्या आहेत. संबंधितांनी जमिनी आपल्या नावे करून देण्यासाठी तहसीलमध्ये अर्ज दाखल केले आहे, असे १९ प्रकरणे तहसील कार्यालयात सुरू आहे. दहा हजार एकर महसूल जमिनीचे हे प्रकरण चांगलेच खोलवर रुजले आहे. यात मोठी साखळी निर्माण झाली आहे. दलालांच्या माध्यमातून बहुतांश जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागणी केलेल्या तीन गावातील प्रकरणे तेवढी रेकॉर्डवर आल्या आहे. जे रेकॉर्डवर नाहीत, परंतु त्यांचे आजही व्यवहार सुरू आहे. असे असताना तलाठ्यांनी जमिनीवर अतिक्रमण झाले नसल्याचा अहवाल दिला. सध्या जमिनीचा एकरी दर १० ते १५ लाख आहे. गावठाणमधील प्लॉटची किंमत दोन ते तीन हजार रुपये प्रती चौरस फूट आहे. महसुली जमिनी रेकॉर्डला असल्या तरी त्या नेमक्या कुठे आणि कोणाच्या ताब्यात आहे, हे मात्र दिसत नाही. महागाव तालुक्यातील ई-क्लास जमिनीच्या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास मोठे गौडबंगाल बाहेर येण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी कुणी याकडे लक्ष देत नाही. (शहर प्रतिनिधी)
ई-क्लास जमीन शासनाच्या रेकॉर्डला आहे. त्या जमिनीची स्थिती काय आहे या विषयी अहवाल मागविला. केवळ नांदगव्हाण, काळी, टेंभी आणि माळकिन्ही येथील १९ अतिक्रमणाचे प्रकरण कार्यालयात सुरू आहे. जमिनीबाबत पुन्हा माहिती घेतली जाईल आणि गैरव्यवहार शोधले जातील.
- चंद्रशेखर कुंभलकर
तहसीलदार, महागाव