अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 10:50 PM2017-12-31T22:50:38+5:302017-12-31T22:50:48+5:30
मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या महागाव तालुक्यातील गुंज येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली. दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत मुंबई येथील त्याच्या खोलीत मृतदेह आढळून आला होता.
गुंज : मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या महागाव तालुक्यातील गुंज येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली. दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत मुंबई येथील त्याच्या खोलीत मृतदेह आढळून आला होता. सदर तरुणाने आत्महत्या केली नसून त्याचा खून केल्याचा आरोप वडीलांनी केला आहे. महागाव तालुक्यात एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
शैलेष नरसिंग चव्हाण (२१) रा. गुंज असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मुंबई येथील रचना संसद आर्किटेक्ट प्रभादेवी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत होता. तो सायन परिसरात मित्रासोबत भाड्याची रुम घेऊन राहात होता. त्याचे खोलीवरील सहकारी बाहेरगावी गेल्याने तो एकटाच होता. गुरुवार २८ डिसेंबर रोजी खोलीच्या बाहेर आला नाही. त्यामुळे घरमालकाने खिडकीतून बघितले तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी मुंबई गाठली.
शैलेशच्या दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आढळून आल्या. तसेच खोलीचे दारही बाहेरून बंद असल्याचे वडीलांना सांगितले. त्यावरून शैलशने आत्महत्या केली नसून त्याचा कुणी तरी घातपात केल्याची तक्रार वडील नरसिंग चव्हाण यांनी सायन पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृतदेह मुंबईहून गुंज येथे आणण्यात आला. दुपारी २ वाजता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसरी घटना
महागाव तालुक्यातील महानगरात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सवना येथील डॉ. विद्या विठ्ठलराव करोडकर (२४) हिने पुणे येथे गळफास लाऊन आत्महत्या केली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच महागाव तालुक्यातील गुंज येथील शैलेश नरसिंग चव्हाण या विद्यार्थ्याने मुंबई येथे आत्महत्या केली. दोघांच्या मृत्युने महागाव तालुक्यातील हळहळ व्यक्त होत आहे.