पुसदमध्ये धोकादायक ‘ड्रेनेज’

By Admin | Published: June 2, 2016 12:19 AM2016-06-02T00:19:05+5:302016-06-02T00:19:05+5:30

शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यावर असलेली ड्रेनेज सिस्टीम अत्यंत धोकादायक स्थितीत असून या नाल्यांवरील जाळ्या तुटल्याने अपघाताची कायम भीती असते.

Dangerous 'drainage' in Pusad | पुसदमध्ये धोकादायक ‘ड्रेनेज’

पुसदमध्ये धोकादायक ‘ड्रेनेज’

googlenewsNext

वाहनधारक त्रस्त : चौकाचौकांतील नाल्यावरील जाळी तुटलेली
अखिलेश अग्रवाल  पुसद
शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यावर असलेली ड्रेनेज सिस्टीम अत्यंत धोकादायक स्थितीत असून या नाल्यांवरील जाळ्या तुटल्याने अपघाताची कायम भीती असते. ड्रेनेज चुकविताना नागरिक त्रस्त झाले आहे.
येथील प्रमुख रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. शिवाजी चौक, सुभाष चौक, गांधी चौक या मुख्य रस्त्यावरून शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, कापड लाईन, नगरपरिषद येथे नागरिक जातात. त्यामुळे २४ तास येथे वर्दळ दिसते. शिवाजी चौकात मधोमध असलेली आणि काही ठिकाणी अत्यंत खोल गेलेले ड्रेनेज आहे. काही ठिकाणी ड्रेनेजच्या लोखंडी जाळ्या बाहेर आल्या आहे, तर काही ठिकाणी तुटलेल्या आहे. सुभाष चौकात चार ड्रेनेज आहे. त्यापैकी एक-दोन ड्रेनेज नेहमीच नादुरुस्त असतात. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. गांधी चौकात दोन ड्रेनेज आहे. येथील ड्रेनेजची अवस्था फारशी चांगली नाही. शिवाजी चौकात मधोमध तीन ड्रेनेज आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून एक ड्रेनेज नादुरुस्त आहे. हा पुसद शहरातील मुख्य चौक आहे. याच मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. पंजाब नॅशनल बँकेसमोरील ड्रेनेजची अशीच अवस्था आहे.
शहरातील सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी नाल्यांची निर्मिती करण्यात आली. अनेक चौकातून या नाल्या रस्त्याच्या मधोमध आहेत. नाल्यांची साफसफाई करण्याच्या दृष्टीने रस्त्याच्या अर्ध्या भागावर लोखंडी जाळी टाकली आहे. परंतु यावरून भरधाव वाहने जात असल्याने या जाळ्या तुटतात. त्यामुळे येथे खड्डे निर्माण होतात. तर दुसऱ्या बाजूला सिमेंटचा धाबा टाकल्याने उंचवटे झाले आहे. अशा परिस्थितीत वाहनधारक आपले वाहन जीव मुठीत घेवून चालवितात. अनेक ड्रेनेजच्या झाकणांमुळे वाहन चालविताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहरातील ड्रेनेजच्या ठिकाणी उंचवटे आणि खोलगट भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त आहे.
पाठीचा त्रास असणारे वाहनधारकांच्या त्रासात यामुळे भर पडते, असे अ‍ॅड.चंद्रशेखर शिंदे यांनी सांगितले. या संदर्भात मुख्याधिकारी, नगरपरिषद उपाध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

Web Title: Dangerous 'drainage' in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.