वणी उपविभागात वाघोबाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 10:14 PM2017-11-07T22:14:25+5:302017-11-07T22:14:36+5:30
वणी आणि झरी तालुक्यात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता ‘वाघ आला रे आला’ च्या अफवेने संपूर्ण वणी उपविभाग ढवळून निघत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी आणि झरी तालुक्यात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता ‘वाघ आला रे आला’ च्या अफवेने संपूर्ण वणी उपविभाग ढवळून निघत आहे. ऐन हंगामात जंगल परिसरातील गावांत वाघाची दहशत पसरली आहे. अलिकडे काही दिवसांत प्रत्यक्षात वाघ पाहणारा पुढे येत नसला तरी निव्वळ वाघ दिसल्याच्या कंड्या मात्र पिकविल्या जात आहेत. त्यामुळे मजूर शेतात जायला तयार नाहीत. परिणामी कापूस वेचणीची कामे खोळंबल्याने कापूस उत्पादक हैैराण झाले आहेत. जादा मजुरी देऊनही मजूर शेतात यायला तयार नसल्याचे शेतकरी सांगतात.
झरी तालुक्याला लागून असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघ झरी तालुक्यात भ्रमंती करीत आहेत, झरी, मुकुटबन परिसरात सहा ते सात वाघ असल्याचे सांगण्यात येते. एक महिन्यापूर्वी अनेकांना या वाघांनी दर्शनही दिले. झरी तालुक्यात वाघाकडून जनावरांवर हल्ला होण्याच्या घटनाही वाढल्या होत्या. मात्र मागील १५ दिवसांत अशी कुठलीही हल्ल्याची घटना घडली नाही. मात्र सोमवारी झरी तालुक्यातील कोसारा गावालगत नारायण गोडे यांच्या शेतातील नाल्यातून पट्टेदार वाघ गेल्याचे मासेमारी करणाºया दोघांनी गावकºयांना सांगितले. त्यामुळे गावकºयांच्या दहशतीत भर पडली.
वणी वनपरिक्षेत्रात नव्याने चार वाघांचा शिरकाव झाल्याची बाबही समोर आली आहे. वणी वनपरिक्षेत्रातील काही ठिकाणी वाघाचे दर्शन झाले. दोन दिवसांपूर्वी अहेरी शेतशिवारात नागरिकांना वाघाने दर्शन दिले. त्यामुळे या भागात देखील दहशतीचे वातावरण आहे. तत्पूर्वी उकणी कोळसा खाणीतही व्याघ्रदर्शन झाले होते.
पाळीव जनावरांवरही व्याघ्र हल्ल्याची भीती
वणीसह झरीजामणी तालुक्यात वाघांची संख्या वाढल्याने पशुपालक धास्तावले आहेत. जनावरे जंगलात चराईसाठी जातात. त्यामुळे या जनावरांवर वाघाचे हल्ले होेण्याचीही भीती आहे. यंदा अल्पवृष्टी झाल्याने जंगलातील पाणवठे कोरडे झाले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वाघ लोकवस्त्यांकडे येण्याची शक्यताही आहे.
वणी वनपरिक्षेत्रात वाघांचा वावर आहे, हे जरी खरे असले तरी अद्याप कुण्या गावातून वाघ दिसल्याची तक्रार वनविभागाकडे आली नाही. मात्र नागरिकांनी शेतशिवारात जाताना सावधगिरी बाळगावी. समुहाने शेतात जावे.
-डी.बी.राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वणी.