अतिरिक्त विद्यार्थीसंख्येच्या महाविद्यालयांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:19 AM2018-08-24T02:19:57+5:302018-08-24T02:20:18+5:30
बारावीचे परीक्षा अर्ज ‘सरल’वरूनच स्वीकारणार; बोर्डाचे स्पष्टीकरण, अवैध विद्यार्थी अडचणीत
यवतमाळ : अकरावी-बारावीमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणारी महाविद्यालये आता अडचणीत येणार आहेत. परीक्षेचे आवेदन पत्र भरताना विद्यार्थ्यांची माहिती केवळ ‘सरल’ प्रणालीतूनच स्वीकारली जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थी परीक्षेपासूनच वंचित राहण्याची शक्यता आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर राज्य शासनाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला कानपिचक्या दिल्या. त्यामुळे बोर्डाने आता अशा महाविद्यालयांना वेसण घालण्यासाठी ‘सरल’ मार्ग शोधला आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांना आॅनलाइन भरावी लागणार आहे. ‘सरल’मध्ये माहिती उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, बोर्डाने सर्व विभागीय सचिवांना याबाबत आदेश दिले असून सरलची माहिती व प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या यात
३० सप्टेंबरपर्यंत ताळमेळ बसविण्यास महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे.
भरारी पथक शोधणार ‘नाममात्र’ विद्यार्थी
प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेत चार भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी महाविद्यालयांना अकस्मात भेटी देऊन नाममात्र प्रवेश घेऊन गैरहजर राहणाºया विद्यार्थ्यांची यादी तयार करावी, असे आदेश शासनाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी दिले आहेत.