खोदकामांनी शहरात फिरणे झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:28 PM2017-11-13T22:28:20+5:302017-11-13T22:28:59+5:30

खड्डेमय का असेना पण यवतमाळ शहरात रस्ते होते. खड्ड्यांना शिवा घालत फिरता तरी येत होते.

Dangers are dangerous for city; | खोदकामांनी शहरात फिरणे झाले धोकादायक

खोदकामांनी शहरात फिरणे झाले धोकादायक

Next
ठळक मुद्देमार्इंदे चौकात मातीच माती : पाईपलाईनसाठी तोडला शहरवासीयांचा संपर्क, धुळीचे प्रचंड लोट

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खड्डेमय का असेना पण यवतमाळ शहरात रस्ते होते. खड्ड्यांना शिवा घालत फिरता तरी येत होते. पण आता शहरातले रस्ते अजस्त्र जेसीबी यंत्रांनी ताब्यात घेतले आहे. नागरिकांना बाहेर फिरायचेच असल्यास मातीच्या ढिगाºयांवरून उड्या मारत, जेसीबीच्या गर्दीतून वाट काढत आणि धुळीत सर्वांग माखतच फिरावे लागते. काल जिथे खड्ड्यांचा रस्ता होता, आज तिथे फक्त भलामोठा खड्डाच आहे... पण बोलण्याची सोय नाही. कारण नागरिकांची ही नाकेबंदी ‘विकास’ अर्थात पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या गोंडस नावाखाली केली गेली आहे.
यवतमाळ शहराला बेंबळातून पाणी पुरवण्यासाठी सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम केले जात आहे. पाणी कधी मिळेल याची खात्री ना अधिकारी देत ना लोकप्रतिनिधी. पण पाईप टाकण्यात सारेच तत्पर दिसत असल्याने शंकेचे वारूळ फुटले आहे. लाखोंचे कंत्राट म्हणून कंत्राटदार नाल्या खोदण्याच्या नावाखाली अर्धा-अधिक रस्ताच खोदून बसला आहे. पण पाईप टाकल्यावर नाल्या व्यवस्थित बुजविण्याची जबाबदारी विसरला आहे. जीवन प्राधिकरणाच्या आशीर्वादाने आणि नगर परिषद बांधकाम विभागाच्या नियोजनशून्यतेने शहरवासीयांच्या नशिबी सध्या पाण्यासोबतच रस्तेही गमावण्याची वेळ आली आहे.
अख्खा मार्इंदे चौकच गायब!
महत्त्वाचे दवाखाने, पतसंस्था, बँका, दुकाने असलेल्या मार्इंदे चौकात दररोज वर्दळ असते. पण पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली संपूर्ण चौकच खोदून टाकण्यात आला आहे. मेन रोड खोदताना किमान वाहतूक वळविण्याची तसदी घेणे आवश्यक असतानाही प्राधिकरणाने किंवा कंत्राटदाराने त्याचा विचारच केलेला नाही. खोदकामाचा जेसीबी, ट्रॅक्टर अस्ताव्यस्त उभे. त्यातच संपूर्ण रस्ता अडविणारे मातीचे पाच फूट उंच ढिगारे. हा संपूर्ण चौकच गायब झाल्याचे दृश्य आहे. दवाखान्यात जाण्यासाठी आलेले रुग्णांचे नातेवाईक अचानक रस्ता बंद असल्याचे पाहून प्रशासनाला शिव्या हासडत आहेत. तर काहीजण चक्क पाच फूट उंच ढिगाºयावरूनही दुचाकी नेण्याची कसरत करून पाहात आहेत. येथील एका बालरुग्णालयाच्या चौकात नाली खोदून बुजविण्यात आली. मात्र, ती नाली अशा पद्धतीने बुजविली आहे, की पूर्वी तेथे रस्ता नव्हताच असे वाटावे. रस्त्याच्या जागेवर दोन फूट उंच माती आहे. त्यावरून महिला दुचाकीस्वारांना अक्षरश: खाली उतरून गाडी लोटत न्यावी लागत आहे.
दाते महाविद्यालयामागील नाल्या उघड्याच
दाते महाविद्यालयामागून उमरसराकडे जाणारा रस्ता तर सध्या हातपाय मोडून घेण्यापुरताच उरला आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी चार फुटांची नाली जेसीबीने खोदण्यात आली. ही नाली काही ठिकाणी नारिकांच्या कंपाउंडला अगदी चिटकून गेल्याने अनेकांचे ‘गेट’ही उघडणे कठीण झाले. तर काही ठिकाणी नाली रस्त्याच्या अगदी मध्यभागी आली. त्यामुळे या रस्त्यावरून गाडी नेणे काय पायी चालणेही मुश्कील आहे. कुणी उड्या मारून जातोच म्हटले तर पाय मोडण्याशिवाय पर्यायच नाही. नाल्या खोदताना तत्परता दाखविणाºया कंत्राटदाराने नाली बुजविण्याबाबत साफ दुर्लक्ष केले आहे. या उघड्या नाल्या जीवघेण्या ठरण्याची शक्यता आहे. जिथे नाल्या बुजविल्या, तिथले रस्ते पूर्वीपेक्षाही खराब झाले आहेत.
आर्णी रोड बनला महामार्गाऐवजी मृत्यूमार्ग
शहरातील आर्णी रोड हा महामार्ग आहे. त्याच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न होत आहेत. पण पाईपलाईनसाठी या रस्त्यावर खोदकामाला उत आला आहे. खोदकामाचे जेसीबी अर्धा रस्ता व्यापून घेत असल्याने जडवाहतूक प्रभावित झाली आहे. जेसीबी कधीही, कसाही झटकन फिरत असल्याने चारचाकी वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागत आहे. त्यामुळे आर्णी नाका परिसरात मिनिटा-मिनिटाला मृत्यूची शक्यता निर्माण झाली आहे. अत्यंत वर्दळीच्या आर्णी मार्गावर खोदकामामुळे पूर्वीची पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे लोट वाहात आहेत. त्यामुळे आर्णीकडून शहरात शिरणाºया वाहनधारकांना यवतमाळात जोरदार पाऊस बरसून गेला का, अशी शंका वाटत आहे.
कनेक्शन तुटले, नेटवर्क संपले, बँकांची लिंक फेल
शहरात बेंबळाच्या पाण्यासाठी धडाक्यात सुरू असलेल्या खोदकामामुळे अस्तित्वातील पाईपलाईनचा मात्र बट्ट्याबोळ केला गेला. अनेक ठिकाणी घरगुती नळकनेक्शनचे पाईप फुटले, तुटले. त्यामुळे पाण्यासाठी आतापासूनच हाहाकार सुरू झाला आहे. भर बाजारात नियोजनशून्य खोदकाम केल्याने दूरध्वनी, इंटरनेट कनेक्शनचे केबल तुटले. त्यामुळे नेटवर्कच नसल्याने कॅफेचे काम थांबले. पतसंस्था, एटीएम, बँकांना लिंकच मिळत नसल्याने व्यवहार खोळंबत आहेत. सर्वसामान्य माणसाच्या सोयीसाठी म्हणून टाकली जाणारी पाईपलाईन सर्वसामान्यांसाठीच त्रासदायक ठरत आहे.

पाईपलाईनच्या नाल्या बुजविल्या जात आहेत. मात्र त्यात काही चुका होत असतील तर ती संपूर्ण जबाबदारी प्राधिकरणाची आहे. कारण कंत्राटदाराचे पेमेंट प्राधिकरण करत आहे. शिवाय या कामातील प्रगतीबाबत प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी पालिकेच्या अभियंत्यांसोबत समन्वय ठेवला पाहिजे.
- ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद यवतमाळ

नाल्या खोदणे आणि बुजविणे ही जबाबदारी कंत्राटदाराची आहे. आता जे रस्ते खोदकामामुळे खराब होत आहेत, ते नगरपालिकेकडून पुन्हा बांधले जाणार आहेत. पालिकेनेच आम्हाला या रस्त्यांची यादी दिली आहे. त्यात पालिकेने ‘अर्जंट’ म्हणून सांगितलेल्या रस्त्यांवर आम्ही पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू केले आहे. संपूर्ण शहरात हे खोदकाम आणखी वर्ष दीड वर्ष तरी चालणार आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये, म्हणूनच सध्या रस्त्याच्या एकाच बाजूने खोदकाम सुरू आहे. ते आटोपले की दुसºया बाजूनेही खोदले जाणार आहे. पुढे ड्रेनेजसाठी तर रस्त्याच्या मधोमध खोदकाम करावे लागणार आहे. डेव्हलपमेंट करताना काही दुष्परिणाम येतातच. मेट्रोच्या कामासाठी नागरिक थांबतातच ना, मग पाईपलाईनसाठी आपण थोडा त्रास सोसलाच पाहिजे. आज का दुख कल का सुख!
- अजय बेले, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण, यवतमाळ

Web Title: Dangers are dangerous for city;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.