रात्रीच्या अंधारात गुप्तधनासाठी यवतमाळ जिल्ह्यात ‘व्हीआयपी’ टोळीचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 01:05 PM2021-08-24T13:05:57+5:302021-08-24T13:07:35+5:30
Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यात सावळी सदोबा येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात गुप्तधनासाठी चक्क जेसीबी लावून रात्रीच्या अंधारात खड्डे केले जात आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पूर्वजांच्या पुण्याईवर ऐश करणारे अनेक आयतोबा आपल्या अवतीभोवती दिसतात. मात्र काही जण आयत्या श्रीमंतीसाठी चक्क गुन्हेगारी आणि जादूटोण्याच्याही आश्रयाला गेले आहे. त्याचाच प्रत्यय आर्णी तालृुक्यात वारंवार येतोय. सावळी सदोबा येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात गुप्तधनासाठी चक्क जेसीबी लावून रात्रीच्या अंधारात खड्डे केले जात आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
जुन्या काळातील राजा महाराजांच्या काळातील धन जमिनीत गाडलेले असावे, या भ्रमातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी सावळी सदोबा येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरावर डोळा ठेवून आहे.
रविवारी रात्री देखील पौर्णिमेचा मुहूर्त हेरुन गुप्तधन शोधणाऱ्या टोळक्याने येथे खोदकाम केले. मात्र त्यांच्या हाती काही लागले का याबाबत साशंकता आहे. हे खड्डे परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र सध्या तरी या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही.
यापूर्वीही जेसीबीने खड्डे
साधारण तीन महिन्यापूर्वी याच सिद्धेश्वर मंदिर परिसरात थेट नागपुरातून काही उच्चभ्रू लोक महागड्या गाड्यांमधून येथे रात्रीच्या वेळी दाखल झाले होते. त्यांनी जेसीबी मशीन लावून येथे खड्डा केला. परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. सावळी सदोबा प्रमाणेच आर्णी तालुक्यात सोनारी, सोनेगाव, दातोडी येथेही गुप्तधनासाठी वारंवार खोदकाम केले जात आहे.
मंदिरच ‘टार्गेट’ का ?
सावळी सदोबा येथे पुरातन हेमाडपंथी मंदिर होते. त्या मंदिराचे आता मोठे बांधकाम झाले आहे. जुन्या काळात एका शेतकऱ्याने मंदिराला १८ एकर जमीन दान दिली. ही जमीन मक्त्याने देऊन त्या पैशातून मंदिरात सप्ताह साजरा केला जातो. याच जमिनीत गुप्तधन असल्याचा अनेकांचा भ्रम आहे. मात्र मक्तेदार शेतकऱ्यांच्या दक्षतेमुळे खोदकाम करणाऱ्यांचे मनसुबे उधळले जात आहे. जुन्या काळात येथे मोठे गाव असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे येथील जमिनीत खजिना असल्याचाही भ्रम आहे.
हे सिद्धीप्राप्त देवस्थान असल्याचा लोकांचा समज आहे. त्यामुळेच त्याला सिद्धेश्वर देवस्थान म्हटले जाते. येथे गुप्तधन असल्याच्या हव्यासातून वारंवार खोदकाम केल्याचे प्रकार दिसून येत आहे. यावर बंदोबस्त लावण्याची गरज आहे.
- प्रल्हादराव जगताप पाटील, शेतकरी सावळी सदोबा.