दारव्हा तालुका झाला टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:38 AM2021-04-12T04:38:15+5:302021-04-12T04:38:15+5:30

दारव्हा : तालुक्याला कधीकाळी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. लाखो रुपयांच्या योजना अपुऱ्या पडत असल्याने तब्बल ४८ ...

Darwha taluka became tanker free | दारव्हा तालुका झाला टँकरमुक्त

दारव्हा तालुका झाला टँकरमुक्त

Next

दारव्हा : तालुक्याला कधीकाळी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. लाखो रुपयांच्या योजना अपुऱ्या पडत असल्याने तब्बल ४८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ यायची. आता त्याच तालुक्याने टंचाईवर मात करीत टँकरमुक्तीकडे झेप घेतली आहे.

पंचायत समितीने प्रयत्न केले. गावकऱ्यांची साथ मिळाली. त्यामुळे दोन वर्षांपासून चित्र बदलले.

२०१९ मध्ये श्रमदानातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचाही चांगला फायदा झाला. सामूहिक प्रयत्नाचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. यावर्षी १५ गावात कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवू शकते. त्यासाठी आराखडा तयार करून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. तालुक्यात ८६ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ९४ गावांच्या १३० वस्त्यांमधील एक लाख ६३ हजार ८९९ नागरिकांना प्रतिदिन, प्रतिव्यक्ती ४० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता ६६ नळयोजना, ४६० विहिरी, ४५३ विंधन विहिरी यासह इतरही काही माध्यमाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, दरवर्षी उन्हाळ्यात मात्र तोरणाळा, तेलगव्हाण, धामणगाव, करजगाव, कोहळा, सांगवी, राजीवनगर, पिंपळगाव, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.) नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, कुऱ्हाड (खु.) निळोणा, राजुरा, जवळा, माहुुली, घाटकिन्ही, हनुमाननगर, पाळोदी, भोपापूर, बोरगाव, शेलोडी, किन्हीवळगी, गौळपेंड, तपोना, कंझरा, सांगलवाडी, वागद (बु.) महातोली, खेड, पळशी, खोपडी (खु.), दर्यापूर, वडगाव (गा.) गाजीपुर, वागद (खु.) बोरी, तपोना, मोरगव्हाण, विडुळ, निंभा, पिंप्री आदींसह काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती.

उपाययोजना करुनही पाणीसमस्या दूर होत नसल्याने यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु, काही वर्षांत पंचायत समिती, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाची अनेक कामे झाली. पंचायत समितीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन केले. तसेच पाणी फाऊंडेशनच्या वाँटरकप स्पर्धेच्या निमित्याने श्रमदानातून अनेक गावात रोपवाटिका, वृक्षारोपण, शेततळे, माती नाला बांध, दगडी बांध, सिमेंट प्लग बंधारे, सीसीटी, सलग समतल चर, धरणातील गाळ उपसणे, माती परीक्षण यासह विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी ठिकठिकाणी मोठे जलसाठे निर्माण होण्यासोबत गावातील पाणी पातळी वाढली. त्यामुळे टंचाईची परिस्थिती दूर होण्यास चांगली मदत झाली.

सध्या कुठेही टँकर लावण्याची परिस्थिती नाही. जून अखेरपर्यंत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेता यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान सांगलवाडी, खेड व बानायत आणि मार्च ते एप्रिल दरम्यान बोरी (खु.) माहुली, वडगाव (गा.) गाजीपुर, महातोली, धामणगाव, कोहळा, राजीवनगर, किन्हीवळगी, तरनोळी, घाटकिन्ही, जवळा आदी गावात खासगी विहीर अधिग्रहण तसेच नळयोजना दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

बीडीओंचे यशस्वी नियोजन

एखाद्या कार्यालय प्रमुखाने व्यवस्थित नियोजन करून काम करून घेतले, तर काय चमत्कार घडू शकतो, याचा प्रत्यय टँकरमुक्तीच्या निमित्ताने आला आहे. बीडीओ पदाचा प्रभार घेतल्यानंतर राजीव शिंदे यांनी पाणीटंचाई निवारणार्थ नियोजन केले. सरपंच, ग्रामसेवक व गावकऱ्यांशी समन्वय राखला. संभाव्य टंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातून तात्पुरत्याऐवजी कायमस्वरूपी कामाकडे लक्ष दिले. त्यामुळे दरवर्षी आराखड्यातील गावात घट झाली. आमदार संजय राठोड यांनी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या सुचनेवरून जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्यांनी या कामाला प्राधान्य दिल्यामुळे बदल घडल्याचे सांगितले जाते.

Web Title: Darwha taluka became tanker free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.