दारव्हा ठाण्यात ८१ गावांचा भार केवळ ६० पोलिसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:30 PM2018-09-17T21:30:21+5:302018-09-17T21:30:40+5:30
पोलीस दप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ८१ गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केवळ ६० पोलीस उपलब्ध आहेत. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे सामाजिक सलोखा व शांतता राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : पोलीस दप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ८१ गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केवळ ६० पोलीस उपलब्ध आहेत. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे सामाजिक सलोखा व शांतता राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. या कमी मनुष्यबळातही दारव्ह्याच्या पहिल्या महिला ठाणेदार रिता उईके यांचे गुन्हेगारी नियंत्रण व सामाजिक शांततेसाठी परिश्रम सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांना समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
दारव्हा पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रण व एसपींच्या आदेशावरून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी नियमित कामकाज व तपास सांभाळून वेळ मिळेल तेव्हा मोहिमा राबविल्या जात आहे. त्यामुळे प्रॉपर्टी व शरीरासंबंधीचे गुन्हे बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहेत. घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न होत आहेत. त्यात त्यांना बºयापैकी यशही मिळते आहे.
आगामी सण, उत्सवाचा काळ बघता ठाणेदार रिता उईके यांनी दारव्हा ठाण्यातील परंपरागत एकाधिकारशाही पद्धत बंद करून अधिकाºयांचे विकेंद्रीकरण केल्याने पोलीस यंत्रणेतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठ महिन्यात दारू, मटका, जुगार विरोधात कारवाई करून ३४६ गुन्हे नोंदविले गेले असून त्यात पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणेदार उईके यांनी आतापर्यंत विविध कलमान्वये ५०० वर व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व अन्य कायद्यान्वये कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाºया ६२ चालकांना पकडण्यात आले. मोटार वाहन कायद्यांतर्गत ७५० व्यक्तींवर कारवाई करून दीड लाखांचा दंड वसूल केला गेला. गेल्या आठ महिन्यात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी एकही घटना दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली नसल्याचे ठाणेदार रिता उईके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सर्व सण, उत्सव शांततेत पार पाडण्यात दारव्हा पोलिसांना यश आले आहे. या कामी आपल्याला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.