दारव्हाच्या संस्थेने उचलली अनाथ मुलींच्या विवाहाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:28 AM2021-06-11T04:28:14+5:302021-06-11T04:28:14+5:30

शाह शिवजी तेजपाल छेडा मेमोरियल ट्रस्ट, असे या संस्थेचे नाव आहे. संस्थेचे अध्यक्ष खिलेश प्रवीणचंद्र घेरवरा यांनी त्याबाबतचे पत्र ...

Darwha's organization took responsibility for the marriage of orphan girls | दारव्हाच्या संस्थेने उचलली अनाथ मुलींच्या विवाहाची जबाबदारी

दारव्हाच्या संस्थेने उचलली अनाथ मुलींच्या विवाहाची जबाबदारी

Next

शाह शिवजी तेजपाल छेडा मेमोरियल ट्रस्ट, असे या संस्थेचे नाव आहे. संस्थेचे अध्यक्ष खिलेश प्रवीणचंद्र घेरवरा यांनी त्याबाबतचे पत्र प्रशासनाला दिले. या कार्यामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात शेकडो नागरिकांना विषाणूचे संक्रमण झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.

दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुली अनाथ झाल्या. कुटुंबांचा आधार गेल्याने गंभीर समस्या निर्माण झाली. अशा मुलींची कौटुंबिक आणि आर्थिक हानी झाल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची शक्यता निर्माण झाली. विवाहयोग्य मुलींच्या विवाहाचा मोठा प्रश्न आहे. अशा कुटुंबावर अचानक कोसळलेल्या संकटाने येथील शाह शिवजी तेजपाल छेडा मेमोरियल ट्रस्टचे संस्था चालक व्यथित झाले. या घटनेमुळे झालेली हानी भरून काढता येणार नाही; परंतु लग्नासारखे कार्य निर्विघ्न पार पडावे, याकरिता संस्थेने त्यांच्या विवाहाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

संस्थेतर्फे अनाथ मुलींचे संपूर्ण खर्चासह लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. वधू, वरांचे कपडे, पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था व इतर लागणारे साहित्य आणि त्या-त्या समाजातील परंपरेनुसार कन्यादानाकरिता लागणारे साहित्य संस्थेकडून पुरविण्यात येईल. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष खिलेश घेरवरा यांनी स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यात त्यांनी पुढील नियोजनाच्या दृष्टीने या आजारामुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील मुलींची यादी मागितली आहे. त्यानंतर प्रशासनाच्या परवानगीने मुलींना तिच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी लग्न समारंभ पार पडला जाईल.

बॉक्स

धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था

संस्थेचे दारव्हाची ओळख असलेले सुप्रसिद्ध अंबादेवी मंदिर आहे. येथे नवरात्र व वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. तसेच पंढरपूर येथे मंदिर, भक्तनिवास आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांना भोजन आणि निवासाची मोफत व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष खिलेश घेरवरा यांनी वृद्धाश्रमांना बांधकाम साहित्य, अन्नधान्य व इतर वस्तूंची अनेकदा मदत केली. इतर सामाजिक कार्यात ते पुढाकार घेतात. कोरोना काळात त्यांनी अनेक उपक्रम राबविले. सामाजिक कार्याचा वसा त्यांनी यानिमित्ताने सुरू ठेवला आहे.

कोट

माझी दोन मंगल कार्यालये कोविड सेंटरकरिता दिली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची अवस्था मी जवळून पाहिली. संकटाच्या या काळात आपलेही काही योगदान राहावे, याकरिता संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

-खिलेश घेरवरा, संस्था अध्यक्ष, दारव्हा

Web Title: Darwha's organization took responsibility for the marriage of orphan girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.