समायोजनासाठी ‘तारीख पे तारीख’
By admin | Published: September 2, 2016 02:33 AM2016-09-02T02:33:58+5:302016-09-02T02:33:58+5:30
जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजनाची अवस्था ‘लांडगा आला रे आला...’
शिक्षक त्रस्त : समायोजनाची अवस्था ‘लांडगा आला रे आला’ सारखी
वणी : जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजनाची अवस्था ‘लांडगा आला रे आला...’ अशी झाली आहे. शिक्षण विभाग सर्व कामे बाजूला सारून वर्षभरापासून केवळ संचमान्यता व अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या मागे लागून आहे. मात्र अतिरीक्त शिक्षकांचे समायोजन आज होणार-उद्या होणार, या चर्चेने शिक्षकही आता त्रस्त झाले आहेत.
खासगी शाळातील संचमान्यता आॅनलाईन मिळू लागल्या. मात्र २०१४-१५ व २०१५-१६ ृच्या संचमान्यतामध्ये अनेक त्रुटी दिसून येत होत्या. त्यामुळे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी शासन निर्णयात बदल करून अनेक शाळांच्या संचमान्यता अनेकदा बदलवून दिल्या. उच्च माध्यमिकच्या २०१५-१६ च्या संचमान्यता तर अखेर आॅफलाईनच करून द्याव्या लागल्या. २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार अतिरीक्त शिक्षकांची संख्या ठरविण्यात आली. जिल्ह्यात २००-२५० शिक्षक अतिरीक्त दाखविण्यात आले. त्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यामध्येही रोस्टर, विषय, सेवाज्येष्ठता याला बाजूला सारून काही संस्थांनी ज्येष्ठ शिक्षकांना अतिरीक्त ठरविले. त्यामुळे ही यादीही वांद्यात आली. त्यामुळे अतिरीक्त शिक्षक व त्यांच्या मुख्याध्यापकांना एकाचवेळी बोलावून शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा अतिरीक्त शिक्षकांची पडताळणी केली. त्यानुसार ही यादी १९४ शिक्षकांवर आली. अतिरीक्त शिक्षक व रिक्त जागेच्या यादीत दोष असू नये म्हणून पुन्हा मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन माहिती भरून घेण्यात आली. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या यादीवर आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या. काही शिक्षकांनी व रिक्त जागा असणाऱ्या संस्थांनी हरकती घेतल्याने त्यांची सुनावणी घेण्यात आली.
२० आॅगस्टपर्यंत अतिरीक्त शिक्षक व रिक्त जागांची यादी अपडेट झाल्याने २४ व २५ आॅगस्टला अतिरीक्त शिक्षकांच्या रिक्त जागांवर समायोजन केले जाईल, असा संदेश शाळांना पाठविण्यात आला. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे २४ व २५ तारखेचे समायोजन रद्द करण्याचा संदेश २३ आॅगस्टला पाठविण्यात आला. त्यानंतर पुन्हा काही शिक्षक व संस्थाच्या हरकती असल्यास त्यांना दुरूस्तीची संधी देण्यात आली. तेव्हा पुन्हा १२ शिक्षकांनी आक्षेप टाकले. हे आक्षेप दुरूस्त करून ३० व ३१ आॅगस्टला समायोजन केले जाईल. अतिरीक्त शिक्षक व रिक्त जागांचे मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असा शिक्षणाधिकाऱ्यांचा संदेश व्हायरल झाला. मात्र दुरूस्तीचा टॅब उपलब्ध न झाल्याने ३० आॅगस्टचे समायोजन रद्द करण्यात आल्याचा संदेश पाठविण्यात आला. आता ३ सप्टेंबरला समायोजन करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)