शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ‘तारीख पे तारीख’, आता 23 मे ठरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 05:00 AM2021-04-02T05:00:00+5:302021-04-02T05:00:06+5:30
पूर्वनियोजित तारखेनुसार परीक्षा केवळ तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्यामुळे विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले होते. दरवर्षी प्रत्येक शाळेकडून आपापल्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेकरिता विशेष तासिका घेतल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा कसून सराव करून घेतला जातो. मात्र, यंदा शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च तयारी करावी लागली. काही शाळांनी मात्र ऑनलाईन क्लासेस घेतल्याने दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि इयत्ता आठवीची पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा २५ एप्रिलऐवजी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २३ मे रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे, तर वेळेपर्यंत अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
पूर्वनियोजित तारखेनुसार परीक्षा केवळ तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्यामुळे विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले होते. दरवर्षी प्रत्येक शाळेकडून आपापल्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेकरिता विशेष तासिका घेतल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा कसून सराव करून घेतला जातो. मात्र, यंदा शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च तयारी करावी लागली. काही शाळांनी मात्र ऑनलाईन क्लासेस घेतल्याने दिलासा मिळाला.
कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास सहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. अर्ज भरण्यासाठी आता १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुदतवाढ मिळाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातून आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसतात.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात येते. यंदा मात्र कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता २३ मे रोजी ही परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे.
परीक्षेला तीन महिने विलंब, विद्यार्थीही घटले
पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच नियोजित होती. मात्र, सुरुवातीला कोरोना महामारीचे कारण देत ही परीक्षा मार्च महिन्यापर्यंत लांबविण्यात आली. त्यानंतर १४ मार्च ही तारीख ठरली. नेमकी त्याच दिवशी एमपीएससीची परीक्षा असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलून २१ मार्च करण्यात आली. पण, अचानक एमपीएससीची तारीख बदलून तीही २१ मार्च झाल्याने शिष्यवृत्तीची तारीख पुन्हा २५ एप्रिल करण्यात आली. मात्र, इतका विलंब होऊनही दरवर्षीच्या तुलनेत निम्म्या परीक्षार्थींनीही अर्ज भरले नाहीत. अखेर पुरेशी विद्यार्थिसंख्या उपलब्ध करण्याबाबत परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना खडसावले. विद्यार्थिसंख्या वाढावी, याच कारणाने आता तब्बल महिनाभरानंतरची २३ मे ही तारीख निश्चित करण्यात आली.