दत्त चौकातील मंदिरात धाडसी चोरी
By admin | Published: July 21, 2016 12:13 AM2016-07-21T00:13:00+5:302016-07-21T00:13:00+5:30
यवतमाळ : यवतमाळ शहराच्या हृदयस्थानी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे धाडसी चोरी झाली.
पहाटेची घटना : मुकुट, छत्रासह साहित्य लंपास
यवतमाळ : यवतमाळ शहराच्या हृदयस्थानी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे धाडसी चोरी झाली. चोरट्याने दत्त मूर्तीचा मुकुट, छत्र आणि अभिषेकाची चांदीची मूर्ती लंपास केली. या घटनेने भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
येथील दत्त चौकातील दत्त मंदिरात नेहमीप्रमाणे पहाटे पुजारी पोहोचले. त्यावेळी त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप फोडलेले दिसले. आत जाऊन बघितले तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्याने येथील मुख्य दत्त मूर्तीचा चांदीचा ५०० ग्रॅम वजनाचा मुकूट गाभाऱ्यातील मूर्तीच्या डोक्यावर असलेले ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे छत्र आणि अभिषेकासाठी असलेली १२५ ग्रॅम वजनाची मूर्ती असा ऐवज लंपास केला. तसेच १०० ग्रॅम वजनाची घंटी, पाच किलो वजनाची पितळी समई, नंदादीप हा ऐवज लंपास केला. चोरी झाल्याची घटना सकाळी पहाटे उघडकीस आली.
या प्रकरणी दत्त मंदिर संस्थानच्या अध्यक्ष नलिनी हांडे यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. शहर व वडगाव रोड पोलिसांनी संयुक्त पथक गठित करून संशयितांचा शोध जारी केला आहे. काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. (कार्यालय प्रतिनिधी)