मोठे वडगावात थाटले पालिकेने डम्पिंग ग्राऊंड
By admin | Published: February 25, 2017 01:00 AM2017-02-25T01:00:19+5:302017-02-25T01:00:19+5:30
शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो योग्य पद्धतीने नष्ट करावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत
दुर्गंधी : वाघाडी नदीच्या पाण्याचेही प्रदूषण
यवतमाळ : शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो योग्य पद्धतीने नष्ट करावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून मात्र मोठे वडगाव परिसरात घाण पसरविण्याचे काम सुरू आहे. शहरातून गोळा केलेला घनकचरा जसाच्या तसाच वडगाव बायपास परिसरात टाकण्यात येत आहे. येथे अनधिकृत डंम्पींग यार्डच पालिकेने तयार केले आहे.
नगपरिषद विस्तारानंतर सर्वप्रथम शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर प्रशासन लक्ष देईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र त्याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी सफाई कंत्राटदाराकडून जागा मिळेल तिथे कचरा टाकण्यात येत आहे. पूर्वी धामणगाव बायपासवर याच पद्धतीने कचरा टाकला जात होता. आताही येथे कमीअधिक प्रमाणात कचरा टाकला जातो. अर्ध्या शहराचा कचरा, वडगाव बायापासवरील वाघाडी नदीत जाणाऱ्या नाल्यात टाकण्यात येत आहे. यामुळे वाघाडी नदीचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील घाण जमा करून वडगाव परिसरातून जाणाऱ्या जांब बायपासवरील नाल्यात टाकली जात आहे. याबाबत तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाही.
याच मुद्दावर पालिकेतील पहिल्याच सर्वसाधारण सभेत वडगाव परिसरातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर या भागात अनधिकृतपणे कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्याचे ढिगारे पेटवून दिले जातात. यातून प्रचंड धूर निर्माण होतो. त्याचा त्रास लगतच्या वसाहतीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अर्धवट जळालेला कचरा कुजल्यानंतर त्यातून निघणारे घाण पाणी थेट नाल्यातून वाघाडी नदीत जात असल्याने या नदी तीरावरील गावांतील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत आता नागरिकांमधून उघड संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)