दोनदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतरही अपत्य

By admin | Published: June 3, 2016 02:40 AM2016-06-03T02:40:06+5:302016-06-03T02:40:06+5:30

छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली.

Daughters even after family welfare surgery twice | दोनदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतरही अपत्य

दोनदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतरही अपत्य

Next

मदतीसाठी प्रशासनाकडे धाव : दोन मुलानंतर शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला दोन मुली
यवतमाळ : छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली. मात्र या शस्त्रक्रियेनंतरही तिला तीन मुली झाल्या. यानंतर अखेर पतीने शस्त्रक्रिया करून घेतली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतरही आपल्याला अपत्य झाल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी आता ही महिला करीत आहे.
यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा येथील सोनीबाई (नाव बदललेले) या महिलेची ही कहाणी आहे. तिचे लग्न झाल्यानंतर एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य झाले. सुखी संसारासाठी दोन मुलावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. १९९५ मध्ये त्यांनी आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित अकोलाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शिबिरात शस्त्रक्रिया करुन घेतली. मात्र काही दिवसातच ही शस्त्रक्रिया फेल झाल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेनंतरही तिला मुलगी झाली. दरम्यान या प्रकाराची तक्रार सदर महिलेने पतीसह आरोग्य विभागाकडे केली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात पुन्हा तिला मुलगी झाली. या प्रकाराने धास्तावलेल्या या कुटुंबाने आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदविली. तसेच तिच्या पतीने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेतली. आता या मुलांच्या पालन पोषणाचा भार या गरीब कुटुंबावर येत आहे. दोन मुलांवरच शस्त्रक्रिया केल्यानंतरही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणखी दोन मुलांचे पालन पोषण करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाची तक्रार तिच्या पतीने जिल्हा परिषदेकडे केली. या प्रकरणात आरोग्य विभागाने चूक मान्य करीत सदर महिलेला नुकसानभरपाई पोटी ३० हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. हा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य समितीपुढे ठेवण्यात आला. यंत्रणेतील दोष मान्य करून ३० हजार नुकसानभरपाईच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे एकाच महिला डॉक्टरने अकोला बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात १९९५ आणि त्यानंतर १९९७ मध्ये सदर महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली होती. दोनही वेळेस शस्त्रक्रिया फेल झाल्याने शेवटी पतीनेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली. आता तीन एकर कोरडवाहू शेती असताना लग्नाला आलेल्या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न या दाम्पत्याला सतावत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Daughters even after family welfare surgery twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.