दारव्ह्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे १५ लाखांची अपसंपदा आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:12 PM2019-02-05T22:12:58+5:302019-02-05T22:14:15+5:30
येथील तत्कालीन तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध १५ लाख ७६ हजार ५८ रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी गुन्हा नोंदविला. हनमंत गणपती होलमुखे (५६) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील तत्कालीन तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध १५ लाख ७६ हजार ५८ रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी गुन्हा नोंदविला.
हनमंत गणपती होलमुखे (५६) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या ते ठाणे येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तंत्र अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध दारव्हा पोलीस ठाण्यात ४ फेब्रुवारीला अपसंपदेचा गुन्हा नोंदविला गेला. दारव्हा येथे तालुका कृषी अधिकारी असताना त्यांच्यावर हा ठपका ठेवला गेला.
सेवाकाळातील त्यांचे उत्पन्न, मालमत्ता व खर्च यात विसंगती आढळून आली. उत्पन्नाचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक कृषी उत्पन्नाच्या बनावट पावत्या तयार करून चौकशी अधिकाऱ्यांकडे सादर केल्या. मात्र सखोल चौकशीत होलमुखे यांनी १५ लाख ७६ हजारांची अर्थात उत्पन्नाच्या २० टक्के अधिक अपसंपदा बाळगल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस निरीक्षक राजवंत आठवले, पोलीस शिपाई प्रमोद धानोरकर, अकबर हुसेन यांनी ही कारवाई केली.
या कारवाईमुळे दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेला ऊत आला आहे. हनमंत होलमुखे यांच्या कार्यकाळादरम्यान शेतकऱ्यांना विविध योजनांसदर्भात झालेल्या त्रासाच्या आठवणी आता अनेकांच्या ओठावर येत आहे. यापुढे कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.