सागवान तस्करीतील डॉन आता कॉटन उद्योगात
By Admin | Published: January 16, 2016 03:12 AM2016-01-16T03:12:35+5:302016-01-16T03:12:35+5:30
अवैध वृक्षतोड व सागवान तस्करीत नेहमीच वन खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते.
अधिकारी-कर्मचारी निलंबित : मुख्य सूत्रधार मोकळाच, शेकडो वृक्षांची अवैध तोड, कोट्यवधींचा माल गेला हैदराबादला
यवतमाळ : अवैध वृक्षतोड व सागवान तस्करीत नेहमीच वन खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र प्रत्यक्षात सागवान तस्करीत गब्बर झालेले सूत्रधार रेकॉर्डवरच येत नाही. या तस्करीत डॉन म्हणून ओळखला जाणारा अद्यापही मोकळाच असून त्याने आता कॉटन उद्योगात आपले पाय रोवणे सुरू केले आहे.
दशकापूर्वी शेतात सालगडी म्हणून काम करणारा हा व्यक्ती आता पाहता-पाहता सागवान तस्करीतील मोठा डॉन बनला आहे. घाटंजी, आर्णी, पारवा, दिग्रस या भागात त्याने मोठ्या प्रमाणात जंगल तोड केली आहे. तस्करीतील हे सागवान त्याने हैदराबादमध्ये पोहोचविले. गेल्या १० वर्षांपासून तो या तस्करीत सक्रिय आहे. आता त्याने या तस्करीतील पैशातून ६० एकर शेती, मेटॅडोअर, ट्रक, ट्रॅक्टर, कार, बंगले आदी संपत्ती जमविली आहे. अलीकडेच विकासाच्या निमित्ताने त्याने एका बड्या लोकप्रतिनिधीला दोन लाख रुपयांची आॅफर दिली होती. तेथूनच त्याच्या या सागवान तस्करी व त्यातून जमविलेल्या बेहिशेबी संपत्तीची चर्चा होऊ लागली आहे. अवैध वृक्षतोड व सागवान तस्करीच्या आड येणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला ‘मॅनेज’ करण्याचे कसब त्याने आत्मसाद केले आहे. त्याच्या वृक्षतोडीच्या कारवायांनी नुकतेच वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित व्हावे लागले. यापूर्वीही काहींना अशा कारवाईला सामोरे जावे लागले. डीएफओ, सीसीएफ कार्यालयाच्या कनिष्ठ यंत्रणेतील काही घटक या डॉनचे खबरे म्हणून काम करीत आहे. त्यामुळेच त्याच्या भागातील जंगलांमध्ये केव्हा धाड पडणार, कुणावर कारवाई होणार याची इत्यंभूत माहिती त्याच्याकडे असते. तो कारागृहाची वारीही करून आल्याचे सांगितले जाते. यवतमाळ विभागाच्या नॉनकरप्ट प्रशासनापुढे आपला टिकाव लागणार नसल्याची जाणीव झाल्याने की काय त्याने अलिकडे सागवान तस्करीकडे काहीसे दुर्लक्ष करून कॉटन उद्योगात आपले पाय रोवले आहे. वर्धा व अकोला जिल्ह्यात कॉटन उद्योग भाड्याने घेऊन कापसाचा व्यवसाय सुरू केल्याचे सांगितले जाते. वन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या वन प्रशासनाने या डॉनचीही कुंडली बनवावी, त्याला रेकॉर्डवर घ्यावे, गेल्या १० वर्षात त्याने किती कोटींचे सागवान तोडून हैदराबादला नेले याचा हिशेब लावावा, त्याच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी, असा सूर वनवर्तुळातूनच पुढे आला आहे. जिल्ह्यातील चार ते पाच वन परिक्षेत्रांतर्गत जंगल तोडून तेथे खेळाचे मैदान बनविण्याची ‘कामगिरी’ या डॉनने केली आहे. मात्र गेल्या दहा वर्षात त्याच्यावर कोणताही वन गुन्हा नोंदविला न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. त्याला कनिष्ठ वन अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबतच वरिष्ठ प्रशासनाचीही तर एवढ्या वर्षात साथ लाभली नाही ना अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)