जिल्हा विशेष शाखेतच गेला गुप्तवार्ता उपायुक्तांचा दिवस
By Admin | Published: January 8, 2016 03:14 AM2016-01-08T03:14:50+5:302016-01-08T03:14:50+5:30
स्टेट इंटेलिजन्स अर्थात राज्य गुप्तवार्ता विभागाचे वार्षिक निरीक्षण गुरुवारपासून सुरू झाले असले तरी उपायुक्तांचा पहिला दिवस हा जिल्हा विशेष शाखेतच गेला.
वार्षिक निरीक्षण : ‘एसआयडी’ची यंत्रणा राहिली प्रतीक्षेतच
यवतमाळ : स्टेट इंटेलिजन्स अर्थात राज्य गुप्तवार्ता विभागाचे वार्षिक निरीक्षण गुरुवारपासून सुरू झाले असले तरी उपायुक्तांचा पहिला दिवस हा जिल्हा विशेष शाखेतच गेला.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या मुंबई येथील उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वात इंटेलिजन्सचे वार्षिक निरीक्षण होत आहे. गुरुवारपासून या दोन दिवसीय निरीक्षणाला प्रारंभ झाला. उपायुक्त कार्यालयाला भेट देतील म्हणून इंटेलिजन्सचे अधिकारी दिवसभर तेथे उपस्थित होते. मात्र उपायुक्तांनी आपल्या निरीक्षणाचा मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेकडे वळविला. तेथेच रेकॉर्ड तपासणीत त्यांचा संपूर्ण दिवस निघून गेला. आता शुक्रवारी शिट रिमार्क नोंदविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
उपायुक्त या गुप्तवार्ता कार्यालयासोबतच कोणत्याही पोलीस ठाण्याच्या खुफिया शाखेलाही अकस्मात भेट देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यवतमाळ शहर व नजीकच्या सर्व प्रमुख ठाण्यातील खुफिया विभाग ‘अपडेट’ झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
उपायुक्त मोनिका राऊत यांच्या वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने का होईना यवतमाळच्या राज्य गुप्तवार्ता अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच कार्यालयात एकत्र उपस्थित पाहिल्याच्या प्रतिक्रीयाही ऐकायला मिळाल्या. एरव्ही कित्येकदा या कार्यालयाचे दरवाजे बंदच दिसतात. तर कधी संगणकावर एखादा कर्मचारी आढळतो. अधिकाऱ्यांबाबत विचारणा केल्यास ‘फिल्ड’वर गेले, एवढेच उत्तर मिळते. अधिकारी ‘फिल्ड’वर असताना त्यांचे निळ्या रंगाचे शासकीय वाहन मात्र तासन्तास कार्यालयापुढेच उभे असते.
यवतमाळच्या ‘परफॉर्मन्स’वर अमरावती नाखूश
यवतमाळातील काही गुप्तवार्ता अधिकाऱ्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर अमरावती विभागीय कार्यालय नाराज असल्याचे सांगितले जाते. कारण या कार्यालयात कुणी केवळ अर्ध्या तासासाठी येतो, कुणी घरुनच कारभार चालवितो तर कुणी ‘लंच ब्रेक’च्या निमित्ताने गेल्यानंतर परत कार्यालयाकडे फिरकतच नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळाली. गुप्तवार्ता विभागाचे निळ््या रंगाचे शासकीय वाहन जिल्ह्यात सर्वदूर परिचयाचे झाले आहे. त्यामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांना खरोखरच वार्ता गुप्तपणे मिळत असतील का आणि त्या गुप्त राहत असतील का असा सूरही पोलीस वर्तुळात आहे.