स्टेट बँक चौकात भरदिवसा वाटमारी
By admin | Published: November 1, 2014 11:14 PM2014-11-01T23:14:30+5:302014-11-01T23:14:30+5:30
धामणगाव येथून तीन ते चार कुरिअर घेऊन आलेल्या एका व्यावसायिक तरुणाच्या तोंडावर स्प्रे मारून आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न करून बोलेरो वाहनातून आलेल्या पाच जणांच्या
यवतमाळ : धामणगाव येथून तीन ते चार कुरिअर घेऊन आलेल्या एका व्यावसायिक तरुणाच्या तोंडावर स्प्रे मारून आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न करून बोलेरो वाहनातून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने त्याचे एक कुरिअर पळविले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील अत्यंत वर्दळीच्या स्टेट बँक चौकात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
गौरव रमेश भिमजीयानी (२२) रा. धामणगाव रेल्वे असे कुरिअर लंपास झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तो धामणगाव येथे आंगडिया कुरिअर सर्व्हिसचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. नेहमीप्रमाणे विदर्भ एक्सप्रेस या रेल्वेने तीन ते चार पार्सल आणि कुरिअर आले होते. ते यवतमाळ येथे संबंधितांना देण्यासाठी तो एसटी बसने सकाळी निघाला. ८.३० वाजताच्या सुमारास तो स्टेट बँक चौकात उतरला. यावेळी त्याने मोठ्या पिशवीतील कुरिअर आणि पार्सल काढून ते एका आॅटोरिक्षात ठेवले. यावेळी मागावर असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने त्याच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर धारदार चाकूने हल्लाही केला. मात्र सुदैवाने त्याने तो हल्ला परतून लावला. परंतु या झटापटीत हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये असलेले एक पार्सल घेऊन बोलेरो वाहनातून पोबारा केला. यावेळी त्याने आॅटोरिक्षाने त्या वाहनाचा पाठलागही केला. मात्र बसस्थानक चौकातून ते वाहन दिसेनासे झाले. घटनेनंतर त्याने या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ कलमान्वये गुन्हा नोंदविला. (स्थानिक प्रतिनिधी)