बंद घरात आढळला मृतदेह, पाेलिसांना कारवाईसाठी हवी तक्रार
By सुरेंद्र राऊत | Published: May 21, 2024 09:16 PM2024-05-21T21:16:47+5:302024-05-21T21:16:58+5:30
अवधुतवाडीचा कारभार : नैसर्गिक मृत्यू झाल्याचा लावला कयास
यवतमाळ : शहरातील आर्णी मार्गावर अमृत सेलिब्रेशन मागे एका बंद घरातून अचानक दुर्गंधी येवू लागली. परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी खिडकीतून डाेकावून पाहिले असता, तिथे एक कुजलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती अवधुतवाडी पाेलिसांपर्यंत पाेहाेचली. दरम्यान सबंधित व्यक्तीचे नातेवाईकही तेथे पाेहाेचले, त्यांनी तक्रार देणार नाही, अशी भुमिका घेतल्याने पाेलिसांनी त्यांच्या स्तरावर नैसर्गिक मृत्यू असे म्हणून प्रकरण निकाली काढले. यात पाेलिसांकडून प्रचंड हलगर्जीपणा हाेत असल्याचे कायदे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे.
एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ताे नैसर्गिक किंवा अनैर्सिगक याचा शाेध घेण्याची जबाबदारी पाेलिसांची आहे. फाैजारी प्रक्रिया संहितेनूसार अशा प्रकरणात कलम १७४ नूसार नाेंद घेवून पाेलिसांना पुढाकार घेत तपास करावा लागताे. मृत्यूचे नेमके कारण पुढे आल्यानंतर हे प्रकरण निकाली काढले जाते. मात्र अवधुतवाडी पाेलिसांनी एका बंद घरात कुजलेला मृतदेह आढळल्यानंतर केवळ नातेवाईक म्हणतात म्हणून प्रकरण साेडून दिले. ज्या घरात मृतदेह हाेता ते घर आतून बंद हाेते, या एवढ्या कारणावरून सबंधित व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाल्याचा कयास पाेलिसांनी लावला आहे. याबाबत अवधुतवाडीचे ठाणेदार नरेश रणधिर यांच्याशी मंगळवारी सायंकाळी संर्पक केला असता त्यांनी यात नातेवाईकांची काेणतीच तक्रार नसल्याने नाेंद घेतली नसल्याचे सांगितले. तर उपविभागीय पाेलिस अधिकारी दिनेश बैसाने यांनी घटनेची माहिती घेवून नेमका काय प्रकर आहे हे सांगताे, अशी प्रतिक्रिया ‘लाेकमत’ ला दिली.