पाण्याच्या शोधात बिबट बछड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:18 PM2018-04-13T23:18:23+5:302018-04-13T23:18:23+5:30

पाण्याच्या शोधात भरकटलेल्या बिबटाच्या दोन बछड्यांपैकी एकाचा मृत्यू तर दुसरा अत्यवस्थ असल्याची घटना महागाव तालुक्यातील वाकान शेतशिवारात शुक्रवारी घडली.

The death of the hippopotamus in search of water | पाण्याच्या शोधात बिबट बछड्याचा मृत्यू

पाण्याच्या शोधात बिबट बछड्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवाकान शेतशिवारातील घटना : दुसऱ्या बछड्याची प्रकृती गंभीर, वन विभागाचे अधिकारी तळ ठोकून

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : पाण्याच्या शोधात भरकटलेल्या बिबटाच्या दोन बछड्यांपैकी एकाचा मृत्यू तर दुसरा अत्यवस्थ असल्याची घटना महागाव तालुक्यातील वाकान शेतशिवारात शुक्रवारी घडली. पाण्याच्या शोधात असलेल्या बिबटापासून हे दोन बछडे भरकटून एका शेतात सकाळी आढळून आले होते. वन विभागाने मादी बिबटाचा शोध जारी केला असून अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. दरम्यान, बिबटाच्या बछड्यांना पाहण्यासाठी दिवसभर शेतात परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.
महागाव तालुक्यातील जंगलांमधील जलस्रोत आटले आहे. त्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी कासावीस झाले आहे. पाण्याच्या शोधात शेतशिवाराकडे धाव घेत आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाकान-कोनदरी शिवारात माळहिवरा रस्त्यावर संतोष राठोड, दीपक सोळंके यांच्या शेताजवळ एक बिबट मादी पाण्याच्या शोधात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे शेतकºयांची पाचावर धारण बसली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका शेतातील दोन दगडामध्ये बिबटाचा नवजात बछडा अडकून असल्याचे काही शेतकºयांच्या लक्षात आले, तर दुसरा त्याच परिसरात होता. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
दोन्ही बछडे वेगळे झाल्याने मादी बिबट निश्चितच येणार म्हणून वनविभागाने ट्रॅप कॅमेरे त्या परिसरात लावले आहे. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नागरिकांना बिबटाच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. दरम्यान, महागावचे पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ.डी.जी. वानोळे तेथे पोहोचले. त्यांनी या बछड्यांची तपासणी केली असता त्यापैकी एका बछड्याला मृत घोषित केले, तर दुसºया बछड्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
या बछड्याचे शवविच्छेदन शनिवारी करण्यात येणार आहे, तर दुसरा बछडा वृत्तलिहिस्तोवर शेतातच असून वन विभागाचे १५ जणांचे पथक त्यावर नजर ठेवून आहे. बिबट येण्याची ते प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे हे दोन्ही बछडे चार ते पाच दिवसापूर्वी जन्मलेले असावे. त्यांचे डोळेही उघडले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पाण्याच्या शोधात एका नवजात बछड्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
जंगलातील जलस्रोत आटले
महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश जंगलातील जलस्रोत आटले आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव सैरभैर झाले आहे. महागाव तालुक्यातील वाकान शिवारात आढळलेले बिबट पाण्याच्याच शोधात या परिसरात आले होते. ज्या ठिकाणी शेतकºयांना बिबटाचे गुरुवारी दर्शन झाले. त्या परिसरात पाणी आहे. त्यामुळे पाण्याच्या भटकंतीत एका नवजात बछड्याचा प्राण गेला. वन विभागाने पानवठे ठिकठिकाणी तयार केले असले तरी त्याची योग्य देखरेख होत नसल्याने अनेक पानवठेही कोरडे पडले आहे. परिणामी वन्यजीव पाण्याविना तडफडून मरत आहे.

Web Title: The death of the hippopotamus in search of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ