जखमी रूपालीचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 10:40 PM2017-12-30T22:40:46+5:302017-12-30T22:40:56+5:30
उन्मत्त होऊन दुचाकी चालविणाऱ्या किशोरवयीनांना हटकल्यानंतर त्या किशोरवयीनांनी जाविणपूर्वक धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या रुपाली प्रमोद वासेकर (४२) या महिलेचा अखेर शनिवारी सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : उन्मत्त होऊन दुचाकी चालविणाऱ्या किशोरवयीनांना हटकल्यानंतर त्या किशोरवयीनांनी जाविणपूर्वक धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या रुपाली प्रमोद वासेकर (४२) या महिलेचा अखेर शनिवारी सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी मंजूषा पुरूषोत्तम गोहोकार यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात किशोरवयीनांविरूद्ध भादंवि २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला. रूपालीच्या निधनाची वार्ता कळताच, शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वणी पोलीस ठाण्यात जाऊन रूपालीचे पार्थिव वणीत येईपर्यंत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तत्पूर्वीच पोलिसांनी आरोपींना शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. दुपारी ११ वाजेपर्यंत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. चौैकशीसाठी चौैघांना ताब्यात घेतले असून यांपैकी दोन अल्पवयीन आरोपींनी पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळ परिसरातील सर्व सीसीटिव्ही कॅमऱ्याचे फुटेज मिळविले. त्यात डॉ.संचिता नगराळे यांच्या रुग्णालयाच्या आवारातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैैद झाल्याचे निदर्शनास आले. या फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकले.
मृत रूपाली ही वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कॉंग्रेसचे संचालक प्रमोद वासेकर यांची पत्नी असून त्यांना दोन मुली आहेत. शनिवारी दुपारी रूपालीचे पार्थिव वणी येथील निवासस्थानी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी शेकडोंनी गर्दी केली. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी येथील मोक्षधामात शेकडोंच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात रूपालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कठोर कारवाईची सर्वस्तरातून मागणी
घडलेल्या घटनेबद्दल वणी शहरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी अल्पवयीन असले तरी परिणामाची जाणिव असतानाही त्यांनी गुन्हा केला. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून करण्यात आली. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. संशयितांचे नातलगही तेथे उपस्थित होते. सर्व संशयित आरोपी हे वणी शहरातील देशमुखवाडी परिसरातील रहिवासी आहेत.
बाईकर्सवर थेट खुनाचा गुन्हा का नाही?
रूपाली वासेकर अपघाती मृत्यू प्रकरणात बाईकर्सस्वारांवर थेट खुनाचाच गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. या मोटरसायकलस्वारांचा हलगर्जीपणा नव्हेतर त्यांनी जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला आहे. त्यामुळे त्यांचा जीव घेण्याचा हेतू स्पष्ट होत असल्यानेच त्यांच्यावर भादंवि ३०२ दाखल करावा, अशी मागणी होत आहे. ही मुले अल्पवयीन असतील तर गाडी मालकावर कारवाईची मागणी होत आहे.