विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसाचे चाॅकलेट घेऊन निघालेल्या शिक्षिकेला गाठले मृत्यूने...

By अविनाश साबापुरे | Published: July 4, 2024 06:56 PM2024-07-04T18:56:07+5:302024-07-04T18:56:31+5:30

Yavatmal : मेहनतीने मिळविलेल्या नोकरीचा आनंद ठरला औटघटकेचा, दुचाकीत अडकला साडीचा पदर

Death of newly job joined teacher in an accident | विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसाचे चाॅकलेट घेऊन निघालेल्या शिक्षिकेला गाठले मृत्यूने...

Death of newly job joined teacher in an accident

अविनाश साबापुरे
यवतमाळ :
गरिबीवर मात करत अपार अभ्यासाने शिक्षिकेची नोकरी मिळाली. आता सारी स्वप्ने पूर्ण होणार या आनंद असतानाच काळाने घात केला. नव्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चाॅकलेट घेऊन निघालेल्या त्या शिक्षिकेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला अन् अपघात झाला. शाळेच्या वाटेवर हा घात झाला अन् दवाखान्याच्या वाटेवर असताना त्यांचा मृत्यू झाला. 

मनिषा दिगांबर घोडके (३४) असे या शिक्षिकेचे नाव आहे. मनिषा यांचे माहेर लातूर जिल्ह्यातील उद्गीरचे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडजवळच्या यवत गावातील दिगांबर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पोटी दोन अपत्ये. मुलगा दुसऱ्या वर्गात अन् मुलगी तिसरीत आहे. पण बीए,बीएड असूनही बेरोजगार असलेले दिगांबर गावात झेराॅक्सचे दुकान चालवायचे. नंतर ते बंद करुन ते कामाच्या शोधात किनवटजवळील गोकुंडा गावात स्थायिक झाले. यादरम्यान मनिषा यांनी शिक्षक भरतीसाठी तयारी केली. अभियोग्यता परीक्षेतून आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यातच त्यांची पवित्र पोर्टलद्वारे यवतमाळ जिल्हा परिषदेत निवड झाली. संपूर्ण प्रक्रिया होऊन त्यांना उमरखेड तालुक्यातील कोरटा केंद्रातील शिवाजीनगरची शाळा देण्यात आली होती. 

बेरोजगारी, गरिबी या साऱ्यांवर आता उत्तर सापडले म्हणून मनिषा, दिगांबर आणि त्यांची मुले आनंदात होती. सोमवारी शाळा सुरु होताच पहिल्या दिवशी मनिषाने हजेरी लावली. आनंदाने मुलांमध्ये त्या रमल्या. मंगळवारही असाच आनंदात गेला. पण बुधवारी सकाळी घात झाला. गोकुंडा येथून केवळ दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या शाळेत जाण्यासाठी त्या आपल्या दुचाकीवर निघाल्या. सोबत मुलगा आणि पतीही होते. पण टाकळी ते दराटी या गावादरम्यान असलेल्या पुलावर त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला अन् काही कळण्याच्या आत त्या कोसळल्या. डोक्याला जबर मार लागला. मेंदू चेंदामेंदा झाला. काही लोकांनी धावपळ करुन त्यांना आदिलाबाद येथे उपचारासाठी नेले. पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. एका होतकरु तरुण शिक्षिकेचा असा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 


मुलीचा वाढदिवस अन् आईचा मृत्यू
जिल्हा परिषदेत निवड झालेल्या दोनशेपेक्षा अधिक शिक्षकांना यवतमाळ येथे नुकतेच निवासी प्रशिक्षण देण्यात आले. त्यातही मनिषा घोडके यांनी समरसून सहभाग घेतला होता. प्रशिक्षणानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळाले होते. या नव्या शिक्षकांचा अद्याप पहिला पगार त्यांच्या हाती पडायचा आहे. अशातच मनिषा यांच्या मुलीचा बुधवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त नव्या शाळेतील मुलांना चाॅकलेट वाटावे म्हणून मनिषा यांनी नातेवाईकांकडून फोन पेवर पैसे मागवून मोठ्या प्रमाणात चाॅकलेट खरेदी केले. ते घेऊन शाळेकडे जाताना त्यांचे अपघाती निधन झाले. मुलीच्या वाढदिवशीच आईचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. आता नोकरी लागली या आनंदात मनिषा यांनी स्वत:चे काही दागिने विक्री करुन गावाकडे घर बांधकाम काढले होते. मात्र तोही आनंद आता अर्धवट राहिला, असे शिवाजीनगर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता मडावी यांनी सांगितले.


मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांचा पुढाकार
मनिषा घोडके यांच्या माहेरची आणि सासरचीही परिस्थिती हलाखीची आहे. नव्याने लागलेली नोकरी हाच या कुटुंबाचा आधार होता. परंतु, मनिषा यांचा अचानक मृत्यू झाल्याने हे कुटुंब हादरले आहे. त्यामुळे यवतमाळसह नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी अवघ्या एका दिवसात त्यांच्या मदतीसाठी अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम गोळा केली. यातून मनिषा घोडके यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे.


नव्या शिक्षकांपैकी तिसरा बळी
पवित्र पोर्टलद्वारे राज्यात गेल्या मार्च महिन्यात हजारो तरुणांना शिक्षकाची नोकरी लागली. मात्र त्यातील तिघांचा अपघाती मृत्यू झाला. एप्रिलमध्येच रुजू होण्यासाठी निघालेल्या दोन तरुण शिक्षकांचा मनिषा घोडके यांच्या प्रमाणेच अपघाती मृत्यू झाला. त्यातील एक घटना नांदेड जिल्ह्यातील, तर दुसरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे.

Web Title: Death of newly job joined teacher in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.