पांढरकवडा वनपरिक्षेत्रात दीड वर्षीय वाघिणीचा मृत्यू, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 05:14 PM2023-10-12T17:14:11+5:302023-10-12T17:15:15+5:30
मृत वाघिणीचे सर्व अवयव शाबूत
पांढरकवडा (यवतमाळ): वनविभागाच्या पांढरकवडा वनपरिक्षेत्राअंतर्गत अर्ली वर्तुळातील अर्ली नियतक्षेत्रात एका दीड वर्षीय वाघिणीचामृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वाघिणीचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे मात्र गुलदस्त्यात आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी या वाघिणीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
वनरक्षक सुरेश मुडांले हे ११ ऑक्टोंबर रोजी जंगलात गस्त करीत असताना दुपारी १२:१० वाजताच्या सुमारास अर्ली वर्तुळातील अर्ली नियतक्षेत्रातील सागवान वृक्षाच्या खाली एक वाघिण मृतावस्थेत आढळून आली. त्यांनी लगेच याबाबत वरिष्ठ अधिकारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याचे दिसून आले. या वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, बाबतची शाहनिशा करण्यासाठी सहाय्यक आयुक्त तथा पशुधन विकास अधिकारी ए. पी. ओंकार यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
मृत वाघिणीचा पंचनामा करून मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. तिचे वय अंदाजे दीड वर्षांचे असावे, असा अंदाज आहे. वाघिणीच्या मृतदेहाचे विच्छेदन करून अवयवांचे नमुने काढून सीलबंद करण्यात आले. त्यानंतर त्याच ठिकाणी वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घटनास्थळी यवतमाळ वनवृत्ताचे वनसंरक्षक व्ही. टी. घुले, विभागीय वन अधिकारी, ए. एन. दिघोळे, मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी, सहाय्यक वनसंरक्षक आर. बी. कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.डी. सुरवसे, व वनकर्मचारी उपस्थित होते.