पांढरकवडा वन विभागातील मांडवा शिवारात वाघिणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 06:50 PM2023-01-28T18:50:43+5:302023-01-28T18:50:57+5:30
पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत घाटंजी वनपरिक्षेत्रातील मांडवा शिवारातील तळ्याजवळ शनिवारी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे.
संतोष कुंडकर
पांढरकवडा (यवतमाळ): पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत घाटंजी वनपरिक्षेत्रातील मांडवा शिवारातील तळ्याजवळ शनिवारी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे. २८ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वन विभाग खडबडून जागा झाला आहे.
वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गुढ कायम आहे. शनिवारी सकाळी वनरक्षक मांडवा गस्तीवर असताना त्याला कुजल्याचा दुर्गंध आला. त्याने परिसरात शोध घेतला असता, एक पट्टेदार वाघिण मृत अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. संबंधित वनरक्षकाने तात्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. या वाघिणीचा मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या क्षेत्रात आणखी तीन ते चार वाघ फिरत आहेत. मृत वाघिणीचे संपूर्ण अवयव शाबूत आहेत.
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पंचनामा करून वाघिणीचे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. सहायक वन संरक्षक सुभाष दुमारे, रणजीत जाधव व वनपरिक्षेत्राधिकारी हेमंत उबाळे यांच्या उपस्थितीत वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाघिणीचा मृत्यू नेमका कशाने?
वाघिण मांडवा बिटात पाण्याच्या तलावाजवळ मृत अवस्थेत पडून होती. कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंध सुटला होता. या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकरित्या की दोन वाघांच्या लढाईत झाला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
वाघाचे वय अंदाजे सहा ते सात वर्षे असून, या वाघाचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला असल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण कळणार आहे.
- सुभाष दुमारे , सहायक वनसंरक्षक, पांढरकवडा