एकाचा मृत्यू, ५४ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:00 AM2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:20+5:30
यवतमाळ शहरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय मोबाईल विक्रेत्याचा बुधवारी कोरोनाने मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी या विक्रेत्याच्या वडिलांचेही निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारात शंभरांवर लोकांची उपस्थिती असल्याचे सांगितले जाते. यावेळी सदर मोबाईल विक्रेता अनेकांच्या संपर्कात आला. त्यामुळे त्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मोबाईल विक्रेत्याने अलिकडेच नागपूरवारीही केल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना करूनही पाहिजे त्या प्रमाणात कोरोना नियंत्रणात येताना दिसत नाही. पॉझिटिव्ह रुग्णांचा दरदिवशीचा आकडा वाढतोच आहे. बुधवारी दिवसभरात ५४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद घेतली गेली आहे.
यवतमाळ शहरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय मोबाईल विक्रेत्याचा बुधवारी कोरोनाने मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी या विक्रेत्याच्या वडिलांचेही निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारात शंभरांवर लोकांची उपस्थिती असल्याचे सांगितले जाते. यावेळी सदर मोबाईल विक्रेता अनेकांच्या संपर्कात आला. त्यामुळे त्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मोबाईल विक्रेत्याने अलिकडेच नागपूरवारीही केल्याचे सांगितले जाते. मोबाईल विक्रेत्याच्या मृत्यूने जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा प्रशासनाच्या दप्तरी २२ नोंदविला गेला आहे. प्रत्यक्षात तो एकने जास्त आहे.
बुधवारी ५४ नव्याने पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यात ३१ पुरुष व २३ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वाधिक २२ जण पुसद शहरातील असून १७ जण पांढरकवडा येथील आहे. याशिवाय नेर एक, दिग्रस सहा, कळंब चार, यवतमाळ एक तर दारव्हा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८७ झाली आहे. तर आतापर्यंतच्या एकूण रुग्णांचा आकडा ६४८ वर पोहोचला आहे. १७ जणांना सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत आयसोलेशन वार्डात ७७ जण उपचारार्थ दाखल आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी ६० नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ५४ पॉझिटिव्ह आले. सुरुवातीपासून आतापर्यंत तब्बल दहा हजार ५५४ रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले गेले होते. यापैकी एक हजार १७ अहवाल प्राप्त झाले. परंतु ५३७ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. नऊ हजार ३६९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना निष्पन्न झालेल्या रहिवासी क्षेत्रांमध्ये कन्टेन्मेंट झोन म्हणून काही परिसर घोषित केला जात आहे. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. या क्षेत्रातून कुणालाही बाहेर पडण्यास मनाई आहे. काही कन्टेन्मेंट झोनला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी स्वत: भेटी देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. उपाययोजनांबाबत यंत्रणेला सूचना दिल्या. कोविड केअर सेंटरमधील सोईसुविधांच्या अभावाबाबत मात्र सर्वत्रच ओरड पहायला मिळते. तेथील संशयित बाहेर फोन कॉल करून माहिती देतात.
यवतमाळ, पांढरकवडा येथे संपूर्ण लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी २५ जुलैपासून पुढील सात दिवसांकरिता यवतमाळ शहर व पांढरकवडा शहरात संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार आहे. त्यातून दवाखाने व औषधी दुकानांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले आहे.
वणी शहरातील ‘त्या’ महिलेच्या मृत्यूचे काय ?
बुधवारी पहाटे वणी शहरातील एका ६५ वर्षीय वृद्धेचा वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मृत्यू झाला. बुधवारी जिल्ह्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र प्रशासनाने एकच मृत्यू नमूद केला. मग या महिलेच्या मृत्यूची नोंद नेमकी कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बुधवारी कोरोना रुग्णांचा आकडाही दुपारपर्यंत ७० पार गेला होता. परंतु सायंकाळी प्रशासनाने हा आकडा ५४ एवढाच दाखविला. इतर रुग्ण गुरुवारी दाखविले जाण्याची शक्यता आहे.
१७ जण कोरोनामुक्त
बुधवारी १७ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. त्यामुळे त्यांंना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा ४४० वर पोहोचला आहे.