कुंभा येथे विजेच्या धक्क्याने सासूसह गर्भवती सुनेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:24 PM2018-06-22T22:24:11+5:302018-06-22T22:25:00+5:30
घरांच्या अंगणातील तारावर कपडे वाळू घालताना विजेचा जबर धक्का बसून सासूसह गर्भवती सुनेचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुंभा येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कुंभा येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : घरांच्या अंगणातील तारावर कपडे वाळू घालताना विजेचा जबर धक्का बसून सासूसह गर्भवती सुनेचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुंभा येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कुंभा येथे घडली.
सासू शकुंतला वामन मोहुर्ले (५५) आणि सून सुनीता शंकर मोहुर्ले (सून) अशी मृतांची नावे आहेत. पावसाने भिजलेले ओले कपडे तारावर वाळण्यासाठी टाकत असताना तारेतील विद्युत प्रवाहाचा जबर धक्का सुनीताला बसला. त्यामुळे ती जमिनीवर कोसळली. तिच्या आवाजाने सासू शकुंतला मदतीला धावली. तिचाही त्या विद्युत प्रवाहित ताराला स्पर्श होऊन जमिनीवर कोसळली. घडलेला प्रकार लक्षात येताच घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर सासू व सुनेला उपचारासाठी वणी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात नेले.
मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात मृतक शकुंतलाबाईच्या मागे पती वामन मोहुर्ले, एक मुलगा व एक विधवा मुलगी आहे, तर सुनेच्या मागे पती शंकर मोहुर्ले व एक पाच वर्षाचा मुलगा, असा परिवार आहे. आकस्मिक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे वृत्त कळताच मारेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार राहुल राऊत व विज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता मेश्राम, सहाय्यक साळुंके यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
अख्खे गाव हळहळले
विजेच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू झाल्याची वार्ता गावात पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येक जण या घटनेने हळहळ व्यक्त करताना दिसत होता.