विजेच्या धक्क्यामुळे गर्भवतीचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 12:30 PM2018-06-22T12:30:57+5:302018-06-22T12:30:57+5:30
ओले कपडे विजेच्या तारावर वाळू घालत असताना धक्का लागून सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याची घटना मारेगाव तालुक्याच्या कुंभा येथे घडली आहे.
यवतमाळ : ओले कपडे विजेच्या तारावर वाळू घालत असताना धक्का लागून सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याची घटना मारेगाव तालुक्याच्या कुंभा येथे घडली आहे. शुक्रवारी (22 जून) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुनेला वाचवण्याच्या प्रयत्नात सासूलाही प्राण गमवावा लागला. सुनिता शंकर मोहुर्ले (२५) आणि शकुंतला वामन मोहुर्ले (५०) अशी मृतांची नावे आहे. सुनिता पाच महिन्याची गरोदर होती. मोलमजुरी करणा-या कुटुंबातील सर्वांनी सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ केली. कपडे धुतल्यानंतर ते वाळू घालण्यासाठी सुनिता तारावर टाकत होती. त्याच वेळी या तारात वीज प्रवाहित होऊन तिला जबर धक्का बसला. ती खाली कोसळली. तिच्या आवाजाने घरात असलेली सासू धावत आली.
तिने सुनेला स्पर्श करताच तिलाही विजेचा जबर धक्का बसला. या प्रकाराने शेजारील मंडळी धावून आले. वीज पुरवठा बंद करून दोघींनाही वणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. सुनिताच्या मागे पती, पाच वर्षाचा मुलगा आणि सासरा आहे. या घटनेने कुंभा गावात हळहळ व्यक्त होत आहे.