रुंझा, नांदुराच्या धोकादायक पुलांवरून जीवघेणा प्रवास
By admin | Published: August 5, 2016 02:19 AM2016-08-05T02:19:09+5:302016-08-05T02:19:09+5:30
दीडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांनी निर्माण केलेले शतकोत्तरी पुलांवरून आजही वाहतूक होत आहे.
शासनाचा मनाई आदेश : तरीही ब्रिटिशकालीन पुलांनाच नागरिकांची पसंती, पोलिसांनाही जुमानत नाहीत
नरेश मानकर/ आरिफ अली पांढरकवडा/बाभूळगाव
दीडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांनी निर्माण केलेले शतकोत्तरी पुलांवरून आजही वाहतूक होत आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही वाहनधारकांची याच पुलाला पसंती आहे. पांढरकवडा तालुक्यातील रुंझा येथील पुलांवरून दररोज जीवघेणी वाहतूक होत आहे. तर बाभूळगाव तालुक्यातील नांदुराचा पूल अनेक जण उपयोगात आणतात. महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेने या पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ब्रिटिशांनी अनेक मजबूत पुलांची निर्मिती केली. त्यापैकीच एक पूल म्हणजे यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील रुंझा येथील पूल होय. १९०० ते १९१०च्या दरम्यान या पुलाचे बांधकाम झाल्याची आठवण जुने-जाणते सांगतात. ११६ वर्षाचा झालेला हा पूल आता अतिशय जीर्णय झाला आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची भीती आहे. अरुंद असलेल्या पुलावरील क्राँकीट उखडले असून बांधकामाला तडे गेले आहे. पुलावर सुरक्षा कठडेही नाही. हा पूल वापरण्यास योग्य नसल्याचे पत्र दहा वर्षापूर्वी ब्रिटीश सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले होते. त्यानंतर रुंझा येथे नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली. गावाच्या बाहेरुन ६०० मीटर लांबीचा बायपास काढण्यात आला. जवळपास एक कोटी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले. आता जुना पूल बंद होईल आणि नवीन पुलावरून वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र बायपास रस्त्याचे काम काही दिवसातच उखडले. रस्ता एवढा निकृष्ट झाला की वाहन तर सोडा पायदळ चालणेही कठीण झाले. परिणामी वाहनधारकांनी आता ब्रिटिशकालीन पुलावरूनच वाहने हाकणे सुरू केले. बायपास रस्त्याच्या अवस्थेने वाहनधारक नाईलाजाने जुन्याच पुलावरून वाहने नेत आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीस बंद असल्याचे घोषित केले. परंतु आजही वाहनधारक याच रस्त्यावरून जीव धोक्यात घालून वाहने नेतात. त्यामुळे महाडसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माघार कुणी घ्यावी यावरून व्हायची भांडणे
बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील बेंबळा नदीवर ब्रिटिशांनी १३८ वर्षापूर्वी पूल बांधला होता. लोखंडी साहित्याने बांधलेला हा पूल रेल्वेसाठी असावा असे जाणकार सांगतात. पूर्वी या अरुंद पुलावरून जाताना अनेक गंमती घडायच्या. मारामारीचे प्रसंग उभे रहायचे. पोलिसांना धाव घ्यावी लागायची. कारण या पुलावरून केवळ एकच वाहन जाऊ शकत होते. दुसरे वाहन समोरुन आले की, एका वाहनाला मागे घ्यावे लागत होते. यातून अनेक प्रसंग उद्भवले. धामणगाववरून मंत्र्यांचा ताफा येत होता त्यावेळी पुलाच्या दोनही बाजूला पोलीस तैनात केले जायचे. कापसाची बैलगाडी तर तासन्तास पुलाच्या कडेला उभी असायची. २००९ मध्ये या जुन्या पुलाच्या जवळच नवीन पूल बांधला. बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी कायमचा बंद केला. मात्र त्यानंतरही या जुन्या पुलावर वर्दळ कायम असते. बैलगाडी, दुचाकी, गुरेढोरे आणि पायदळही वाहतूक सुरूच असते.
विजय दर्डा यांचे मानले आभार
नांदुरा येथील अरूंद पुलामुळे विविध समस्या उद्भवत होत्या. ही बाब लक्षात येताच लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री टी.आर.बालू यांना नवीन पुलाची गरज पटवून दिली. त्यासाठी त्यांनी केंद्रीय निधी खेचून आणला. या पुलावर टोल टॅक्स लागू नये, अशी व्यवस्थाही विजय दर्डा यांनी निधी मंजूर करतानाच करून ठेवली. यानंतर १५ फेब्रुवारी २००७ रोजी जुन्या पुलालगत एकाचवेळी तीन ते चार वाहने जाऊ शकतील, अशा टोलेजंग पूल बांधकामाला सुरूवात झाली. १४ डिसेंबर २००८ रोजी नवीन पूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. यामुळे सर्व भांडण, तंटे बंद झाले. यामुळे परिसरातील नागरिकांनी विजय दर्डा यांचे पत्र पाठवून आभार मानले. हा नवीन पूल २४२ मीटर लांब, १०.५० मीटर रूंद आहे. पुलाला आठ पीलर आहेत. तीन पदरी पूल आहे. या पुलाला त्यावेळी आठ कोटी २० लाख रूपये बांधकाम खर्च आला.