वजनातील तफावतीमुळे शेतकरी-व्यापाऱ्यांत वाद

By admin | Published: January 22, 2017 12:13 AM2017-01-22T00:13:46+5:302017-01-22T00:13:46+5:30

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वजनात फसविण्याचा प्रकार व्यापाऱ्यांकडून सातत्याने सुरू आहे.

Debate in Farmers-Traders due to Variable Variation | वजनातील तफावतीमुळे शेतकरी-व्यापाऱ्यांत वाद

वजनातील तफावतीमुळे शेतकरी-व्यापाऱ्यांत वाद

Next

दिग्रसमध्ये कापूस जप्त : वजन काटे घेऊन व्यापारी पळाला
दिग्रस : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वजनात फसविण्याचा प्रकार व्यापाऱ्यांकडून सातत्याने सुरू आहे. शनिवारी मात्र एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याची ही बनवेगिरी ओळखून चांगलाच वाद घातला. बिंग फुटल्यामुळे व्यापारी वजन काटे घेऊन पळाला. तर तहसील, पोलीस आणि बाजार समितीच्या कारवाईत तीन क्ंिवटल ९५ किलो कापूस जप्त करण्यात आला.
शनिवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजारात वर्दळ होती. बाजार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. स्थानिक सहकारी जिनिंग समोरील शांतीलाल अटल यांच्या घरासमोर एक व्यापारी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचा कापूस विकत घेत होता. एका शेतकऱ्याने आपला कापूस आधीच मोजून घेतला होता. व्यापाऱ्याने कापसाचे वजन सांगितले, तेव्हा शेतकरी चक्रावून गेला. वजनामध्ये बरीच तफावत आली होती. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यामध्ये वाद पेटून व्यापाऱ्याचे बिंग फुटले. घटनास्थळावर गर्दी वाढून शहरभर चर्चा पसरली. तहसीलदार किशोर बागडे यांना माहिती मिळताच नायब तहसीलदार संजय राठोड, तलाठी नारायण हगोणे, गजानन चौधरी तसेच पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बाबाराव पवार, पोलीस कॉन्स्टेबल नीळकंठ चव्हाण घटनास्थळी पोहोचले. गर्दी पांगविण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना गर्दीचा फायदा घेत संबंधित व्यापारी वजन काटे घेऊन पळून गेला. मात्र कापूस तेथेच विखुरलेला होता. तर वाद घालणाऱ्या शेतकऱ्यासोबत व्यापाऱ्याने सेटींग केल्याचीही चर्चा परिसरात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रमण ठाकरे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पळून जाताना व्यापाऱ्याने कापूस तेथेच सोडून दिला होता. सर्व अधिकाऱ्यांनी त्या कापसाबाबत चौकशी केली असता कोणीही समोर आले नाही. त्यामुळे शेवटी तीन क्ंिवटल ९५ किलो कापूस जप्त करण्यात आला. व सुपूर्दनाम्यावर हा कापूस शासनाच्यावतीने एका जिनिंगमध्ये ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Debate in Farmers-Traders due to Variable Variation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.