हॉकी स्पर्धेतील पाचही सामन्यांत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:07 PM2017-09-11T22:07:07+5:302017-09-11T22:07:35+5:30
मागील तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत होणाºया वादाची परंपरा याहीवर्षी कायम राहिली. ....
नीलेश भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मागील तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत होणाºया वादाची परंपरा याहीवर्षी कायम राहिली. येथील अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात आयोजित नेहरू कप व शालेय हॉकी स्पर्धेत झालेल्या पाचही सामन्यात पंचाच्या निर्णयावर घेतलेल्या आक्षेपांनी सामन्यात व्यत्यय येऊन वाद निर्माण झाल्याने ही स्पर्धा चांगलीच वादग्रस्त ठरली.
क्रीडा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ व हॉकी डिस्ट्रीक असोसिएशन आॅफ यवतमाळ यांच्यावतीने या स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू कप हॉकी १५ व १७ वर्ष मुले-मुली आणि शालेय १४, १७, १९ वर्ष वयोगट मुले-मुली या दोन्ही स्पर्धेत जिल्ह्यातून विवेकानंद हायस्कूल, साई विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, अमोलकचंद कनिष्ठ महाविद्यालय व अभ्यंकर कन्या शाळा, असे केवळ पाच संघ सहभागी झाले होते.
जिल्ह्यात हॉकी खेळाच्या दोन संघटना कार्यरत असल्याने प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी दोन्ही संघटनेच्या सहमतीने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. तांत्रिक बाजूची जबाबदारी डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशन आॅफ यवतमाळ या संघटनेकडे दिली. शालेय हॉकी स्पर्र्धेेच्या १९ वर्ष गटातील मुलींचा एकमेव सामना अमोलकचंद महाविद्यालय विरुद्ध अभ्यंकर संघादरम्यान मध्यंतरानंतर पंचानी दिलेल्या निर्णयावर अभ्यंकर संघाच्या मार्गदर्शकांनी तीव्र आक्षेप घेतला. पेनॉल्टी कॉर्नरची मागणी करीत संघातील खेळाडूंना मैदानावरच बसवून ठेवले. महत्वाचे म्हणजे अभ्यंकर संघ १-० गोलने आघाडीवर होता. स्पर्धा संयोजक व मार्गदर्शकांमध्ये तोडगा न निघाल्याने सामना होऊ शकला नाही. शेवटी गोल आधारावर अभ्यंकर संघालाच विजयी घोषित केले.
नेहरू कप १७ वर्ष वयोगटात मुलींच्या राणी लक्ष्मीबाई विरुद्ध अभ्यंकर संघादरम्यानच्या सामन्यात पंच निर्णयावर बराच वाद झाला. सामना थांबविण्यात आला. एक वेळ पंचानेही शिटी फेकून पंचगिरी न करण्याचा निर्णय घेतला. साई विद्यालय विरुद्ध विवेकानंद सामन्यात पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. विशेष म्हणजे स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा कार्यालयाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. विशेष असे की, विभागीय हॉकी स्पर्धा यवतमाळ येथे १६ ते १८ सप्टेंबरला होणार आहे. हॉकी स्पर्धेतील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाला विभागीय स्पर्धा आव्हान ठरणार आहे.