कर्जमाफी याद्यांचे आता होणार चावडी वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:42 AM2017-09-24T00:42:17+5:302017-09-24T00:42:29+5:30
कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट केले जाणार आहे. गावपातळीवर कर्जमाफी याद्यांचे वाचन होणार असल्याने मोठा विलंब लागण्याची चिन्हे आहेत.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट केले जाणार आहे. गावपातळीवर कर्जमाफी याद्यांचे वाचन होणार असल्याने मोठा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. यामुळे दिवळीपूर्वी कर्जाची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता दुरावली आहे.
जिल्ह्यातील तीन लाख ६७ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असल्याचा अंदाज राज्य शासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात दोन लाख ५० हजार ३८६ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अद्यापही या प्रक्रियेतून जिल्ह्यातील एक लाख १७ हजार शेतकरी बाहेर असल्याचे स्पष्ट होत आहे. या शेतकºयांना कर्जमाफी मिळणे अशक्य झाले आहे. अर्ज दाखल न केलेल्या शेतकºयांनी अद्यापही मुदतवाढीची कोणतीही मागणी शासन अथवा प्रशासनाकडे केली नसल्याचा दावा यंत्रणेने केला.
दुसरीकडे बँकांकडून कर्जमाफी अर्जासंदर्भात ६६ कलमांमध्ये आॅनलाईन अहवाल मागविण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक बँकांच्या शाखांकडे संगणक नाही. त्यामुळे कच्ची यादी तयार करून ही माहिती संगणकावर फिड करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. २२ सप्टेंबरपर्यंत आॅडीट संपवण्याच्या सूचना शासनस्तरावरून होत्या. प्रत्यक्षात बँक स्तरावरील काम खोळंबले आहे. त्यासाठी आणखी आठ दिवस लागणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकºयांचे अर्ज आणि बँकांची यादी जुळल्यानंतर यादीचे चावडी वाचन होईल. यात गावपातळीवरून काही अडचणी आल्यास त्या सोडविल्या जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
३३ आॅडीटरवर साडेतीन लाख खात्यांचा भार
जिल्ह्यात केवळ ३३ शासकीय आॅडीटर (लेखा परीक्षक) आहे. या तोकड्या लेखा परीक्षकांवर तीन लाख ६७ हजार शेतकºयांचे खात्यांचे आॅॅडीट करण्याचा भार पडला आहे. त्यामुळे मुदतीत त्यांनाही सर्व खात्यांची तपासणी करणे शक्य झाले नाही. त्यांनाही आणखी आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. लेखा परीक्षकांची संख्या तोकडी असल्याने पुढील आठ दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल किंवा नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. या सर्व बाबींमुळे दिवाळीपूर्वी माफीची रक्कम खात्यात जमा होणे दुरापास्त झाले आहे.
सभासद अंधारातच
कर्जमाफीसाठी केवळ थकबाकीदार शेतकरी पात्र आहेत, असा गैरसमज गावपातळीवर आहे. मात्र नियमित खातेधारकालाही आॅनलाईन अर्ज भरायचे होते, याची माहिती त्यांना नव्हती. यामुळे हजारो नियमित खातेधारकांचे अर्ज सबमिटच झाले नाही.
राज्यातील ५६ लाख खातेधारकांनी आॅनलाईन नोंद केली. बँक स्तरावरचे कामकाज आटोपल्यानंतर सोशल आॅडीट होईल. नंतर कर्जमाफीची पुढील प्रक्रिया होईल. सध्या मुदतवाढीसाठी सूचना नाही.
- विजय झाडे
सहकार आयुक्त, पुुणे