शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी कर्जमाफी - पालकमंत्री मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 05:51 PM2017-10-18T17:51:16+5:302017-10-18T17:51:47+5:30

जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाइन पद्धतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे.

Debt Waiver to Support Farmers - Guardian Minister Madan Yerawar | शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी कर्जमाफी - पालकमंत्री मदन येरावार

शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी कर्जमाफी - पालकमंत्री मदन येरावार

Next

यवतमाळ : जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाइन पद्धतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. हे सरकार शेतक-यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. अडचणीतील शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी ही कर्जमाफी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्ह्यातील शेतक-यांना कर्जमाफी अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम आणि पात्र कुटुंबाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मंचावर वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवकुमार रेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, संजय जोशी आदी उपस्थित होते.

ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानून पालकमंत्री येरावार म्हणाले, कर्जमाफीची रितसर सुरुवात आजपासून प्रत्येक जिल्हास्तरावर झाली आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याच्या मागे शासन सदैव उभे आहे. कृषी वाहिन्या, जलयुक्त शिवार, शेततळे, मार्केट लिंकेज आदी योजना सरकारने आणल्या आहेत. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. या योजनेचे अनेक वैशिष्टे आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकेच्या 1 लक्ष 48 हजार 765 आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1 लक्ष 68 हजार 962 शेतकरी असे एकूण 3 लक्ष 42 हजार 200 शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यात बीड नंतर यवतमाळ येथील कर्जमाफी मिळणा-या शेतक-यांची संख्या सर्वात जास्त आहे. सद्यस्थितील दिवाळीनिमित्त काही दिवसांच्या सुट्टया आल्या असल्या तरी कर्जमाफीची ही प्रक्रिया नियमित सुरु राहील. शासन, प्रशासन प्रत्येक शेतक-यांपर्यंत पोहचेल. शेतक-यांच्या खात्यात 15 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, ही संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफी आहे. या कर्जमाफीत प्रत्येक अडचणीत असलेल्या शेतक-यांचा समावेश झाला आहे. शासनाने शेतक-यांचा सातबारा कोरा केला आहे. या कर्जमाफीमुळे समोरच्या हंगामात बँकांची दारे शेतक-यांसाठी उघडी झाली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शेतक-यांना मिळालेली कर्जमाफी ही दिवाळीच्या आनंदात दुग्धशर्करा योग आहे. तांत्रिक अडचणीवर मात करून जिल्हा प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली. यासाठी पालकमंत्र्यांचे मोठे सहकार्य लाभले. सहकार विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, महसूल यंत्रणा आदी शासकीय यंत्रणांनी या कामासाठी चांगली मेहनत घेतली, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुबारकपूर (ता.बाभुळगाव) येथील किरण गोडे, नांदसावंगी (ता.बाभुळगाव) येथील गोविंद भटकर, मुकुटबन (ता.झरीजामणी) येथील मनोहर देवाडकर, रमेश माडीकुन्टवार (सत्तापल्ली, ता. झरीजामणी), कैलास ताकसांडे (वाटखेड, ता. राळेगाव), अनंता मानकर (वाटखेड, ता. राळेगाव) यांच्यासह एकूण 29 शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र, साडीचोळी, टॉवेल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या या 29 शेतक-यांची कर्जमाफीची एकूण रक्कम 24 लक्ष 92 हजार 168 ऐवढी आहे. तत्पूर्वी सहायक निबंधक अर्चना माळवे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री यांचा संदेश वाचून दाखविला. यावेळी सहकार विभागाचे सुनील भालेराव, कैलास खटारे, नितीन देशपांडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाढे पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक कैलास कुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Debt Waiver to Support Farmers - Guardian Minister Madan Yerawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी