ठरलं ! ‘या’ दिवसापासून ‘2,000’ घेणार नाही; भुर्दंड बसण्याच्या भीतीने एसटीची डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:51 AM2023-09-09T07:51:08+5:302023-09-09T07:51:41+5:30
विलास गावंडे यवतमाळ : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट चालविण्यासाठी ३० सप्टेंबर शेवटचा दिवस दिला आहे. एसटी ...
विलास गावंडे
यवतमाळ : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट चालविण्यासाठी ३० सप्टेंबर शेवटचा दिवस दिला आहे. एसटी मात्र ४८ तास आधीपासूनच ही नोट स्वीकारणे बंद करणार आहे. २८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून दोन हजाराची नोट स्वीकारायची नाही, असा आदेश महामंडळाचे वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी काढला आहे.
बँकेचा आदेश
३० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असा रिझर्व्ह बँकेचा आदेश आहे. एसटीने या दिवसापर्यंत प्रवाशांकडून ही नोट स्वीकारल्यास बँकेत भरण्यासाठी १ ऑक्टोबर उजाडेल. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून एसटी ४८ तास आधीच दोन हजाराच्या नोटेचा व्यवहार थांबविणार आहे.
४८ तास आधीच
२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात आलेल्या नोटा २९ रोजी बँकेत भरल्या जातील. २९ रोजी स्वीकारलेल्या नोटा भरण्यासाठी एक दिवस एसटीकडे आहे. जोखीम न घेता एसटीने ४८ तास आधीच अकाउंट क्लोज करण्याचा निर्णय घेतला आहे.
नोटा २९ ला जमा करण्याचा आदेश
२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा महामंडळाकडे येऊच नये यासाठीची संपूर्ण जबाबदारी विभागावर टाकण्यात आली आहे. अंमलबजावणी विभाग नियंत्रकांना करायची आहे. २८ च्या मध्यरात्रीपर्यंत आलेल्या दोन हजारच्या नोटा २९ ला बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थातच यासाठी ३० तारखेची वाट पाहायचीच नाही.