‘एसआयटी’ अहवालावर जबाबदारी होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:08 PM2017-10-30T22:08:35+5:302017-10-30T22:09:11+5:30

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे.

The decision will be taken on account of 'SIT' report | ‘एसआयटी’ अहवालावर जबाबदारी होणार निश्चित

‘एसआयटी’ अहवालावर जबाबदारी होणार निश्चित

Next
ठळक मुद्देफवारणीचे २० बळी : कृषी, आरोग्य, महसूलला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे. तब्बल चार तास विविध यंत्रणेच्या प्रमुखाकडून या पथकाने माहिती घेतली असून समितीच्या अहवालावरच विषबाधेची जबाबदारी निश्चित होणार आहे. त्यामुळे ही समिती जिल्ह्यात दाखल होताच सर्वांनाच धडकी भरली.
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यू तर ७०० जणांना विषबाधा झाली. याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’चे गठण केले. अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्या अध्यक्षतेत ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे, कृषी सहसंचालक डॉ. सुभाष नागरे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. धनराज उंदीरवाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांचा समावेश आहे. ही समिती सोमवारी यवतमाळात दाखल झाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात फवारणी बाधेची स्थिती जाणून घेतली.
बाजारात कोणत्या प्रकारची कीटकनाशके विकली गेली, नेमके याच वर्षी काय बदल झाला, कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाने काय कारवाई केली, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विषबाधा रुग्णांसाठी कोणता प्रोटोकॉल पाळला जातो आणि मृत्यू झालेले आणि बाधित रुग्णांच्या कौटुंबिक स्थितीची सविस्तर माहिती घेतली. प्रत्येक विभागाला सूक्ष्म माहिती देण्यास सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.टी.जी. धोटे, मेडिलकचे डॉ. बाबा येलके, डॉ. घोडेस्वार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.
‘मेडिकल’मध्ये विषबाधितांची भेट
‘एसआयटी’च्या पथकाने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. वार्ड क्र. १८ मध्ये उपचार घेत असलेल्या विषबाधित शेतकरी-शेतमजुरांसोबत संवाद साधला. यावेळी सुनील उकंडे (३२) रा. मनपूर ता. आर्णी, विशाल लक्ष्मण मडावी रा. राजूरवाडी ता. घाटंजी, विजय राठोड रा. ब्रम्हनाथ ता. दारव्हा, हरिभाऊ कुंभेकार रा. भारी ता. यवतमाळ यांच्याशी संवाद साधला. किती दिवसापासून फवारणी करीत आहात, कोणती औषध फवारली, फवारणीचे मिश्रण कुणाच्या सांगण्यावरून केले, किती औषधाचे मिश्रण तयार केले, याची माहिती पथकातील सदस्यांनी घेतली. त्यानंतर अतिदक्षता कक्षात तीन रुग्णांची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार यांनी रुग्णालयातील समस्या पथकापुढे मांडल्या.
दारव्हा येथे फवारणी बाधितांशी चर्चा
दारव्हा : ‘एसआयटी’ पथकाने सोमवारी दारव्हा येथे भेट दिली. प्रत्यक्ष शेतकºयांशी विश्रामगृहावर संवाद साधला. यावेळी तालुक्यातील पाच शेतकºयांना बोलाविण्यात आले होते. तब्बल दोन तास ही बैठक सुरूच होती. यावेळी विजय भाऊराव राठोड (इरथळ), मोहन देविदास हिवराळे (बिजोरा), भारत शंकर साखरकर (अंंतरगाव), विष्णू महादेव गावंडे (घनापूर), भारत उकंडा आडे (शेलोडी) यांच्याशी चर्चा करून विषबाधेची कारणे जाणून घेतली. त्यानंतर तालुक्यातील उचेगावच्या सेवादासनगर येथे रवी राठोड या मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.
सर्वांनाच भरली धडकी
मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या ‘एसआयटी’चे पथक जिल्ह्यात दाखल झाले. ही समिती सूक्ष्म अभ्यास करून फवारणी विषबाधा प्रकरणास जबाबदार असणाºयांवर दोष निश्चित करणार आहे. कृषी विभागावरच या पथकाचा अधिक भर होता. हे प्रकरण इतक्या उशिरा का बाहेर आले, यावरही कृषी यंत्रणेकडे जाब विचारण्यात आला. कीटकनाशकांच्या हाताळणीबाबत कृषी विभाग काय उपक्रम राबवित आहे, याचाही अहवाल मागविला. यामुळे कृषी विभागासोबतच सर्वांनीच या पथकाची धास्ती घेतली आहे.

Web Title: The decision will be taken on account of 'SIT' report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.