पीक विमा मुदतवाढीस नकार

By admin | Published: July 28, 2016 12:52 AM2016-07-28T00:52:14+5:302016-07-28T00:52:14+5:30

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असून जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. ...

Decline in crop insurance term | पीक विमा मुदतवाढीस नकार

पीक विमा मुदतवाढीस नकार

Next

नेटवर्क जाम : बँकांपुढे भरपावसात शेतकऱ्यांच्या तासन्तास रांगा, उरले दोन दिवस
यवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असून जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. अशा परिस्थितीत पीक विमा हप्ता भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पुढे आली. परंतु पीक विम्याला मुदतवाढ देण्यास वरिष्ठांनी नकार दिला.
पंतप्रधान पीक विमा ही योजना यावर्षीपासून सुरू झाली आहे. यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असून त्यासाठी रिलायन्स कंपनीने पुरविलेले अर्जच ग्राह्य धरले जातात. गत दोन दिवसांपर्यंत पीक विम्याचे अर्जच शेतकऱ्यांंना मिळत नव्हते. थोडे थोडके अर्ज उपलब्ध झाल्यानंतर शेतकरी बँकांमध्ये धडकले. परंतु सातबारा आणि पेरेपत्रकाचा मोठा अडसर निर्माण झाला. पीक विम्यासाठी सर्व प्रथम सातबारा आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यात महसूलचे बुधवारी दिवसभर नेटवर्क जाम राहिले. त्यामुळे तलाठी साजा आणि तहसीलमध्येही सातबारा काढता आला नाही. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर सातबारा बाहेर येत होता. यानंतर तलाठ्यांनी स्वयंघोषणा पत्राच्या आधारावर पेरेपत्रक लिहून दिले. या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज शेतकऱ्यांंना वितरित करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांचे दुर्दैव संपले नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. वरून पाऊस आणि बाहेर रांगा अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे. तासन्तास प्रतीक्षा करूनही बँकेत विमा हप्ता भरणे शक्य होत नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. असे निवेदन जिल्हाधिकारी आणि कंपनीकडे सादर केले. मात्र कंपनीकडून सध्या कुठलेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अवघ्या तीन दिवसातच विमा उतरावा लागणार आहे.
सव्वालाख अर्ज उपलब्ध
पीक विमा काढण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साडेचार लाख अर्जांची आवश्यकता आहे. मात्र कंपनीकडून अपुरे अर्ज आल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला. बुधवारपर्यंत जिल्ह्यात सव्वालाख अर्ज उपलब्ध झाले आहे. उर्वरित अर्ज दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. मात्र किती अर्ज येतील हे कुणीही सांगू शकत नाही. (शहर वार्ताहर)

दारव्हा येथे बँक अधिकाऱ्यांंना घातला घेराव
दारव्हा : पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख जवळ आली तरी पीक विम्याचे अर्ज मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दारव्हा येथील मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव घातला. तणाव निर्माण झाल्याने ही बाब स्थानिक कर्मचाऱ्यांनी बँकेचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर बँक अधिकारी व रिलायन्स कंपनीमध्ये झालेल्या चर्चेनुसार बँकेने पुरविलेले अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे हा वाद निवळला. बुधवारी दारव्हा येथील शाखेत पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. जोपर्यंत विम्याचे अर्ज मिळणार नाही तोपर्यंत घेराव मागे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. बँकेने पुरविलेल्या नमुन्यातील अर्जाची झेरॉक्स स्वीकारण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याने हा वाद संपुष्टात आला. यासंदर्भात जिल्हा बँकेचे दारव्हा विभागीय अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांच्याशी संपर्क साधला असता अर्जाचा तुटवडा पडला आहे. बुधवारी त्यामुळेच परिस्थिती उद्भवली. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)


 

Web Title: Decline in crop insurance term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.