कर्जवसुली टक्का घटला
By admin | Published: April 5, 2017 12:21 AM2017-04-05T00:21:57+5:302017-04-05T00:21:57+5:30
यंदा जिल्हा बँकेच्या वणी शाखेच्या कर्ज वसुलीचा टक्का घटला आहे. सन २०१५-१६ मध्ये ९१ टक्के कर्जवसुली झाली होती.
वणी तालुका : जिल्हा बँकेची कामगिरी ८१ टक्के
वणी : यंदा जिल्हा बँकेच्या वणी शाखेच्या कर्ज वसुलीचा टक्का घटला आहे. सन २०१५-१६ मध्ये ९१ टक्के कर्जवसुली झाली होती. मात्र सन २०१६-१७ मध्ये केव ळ ८१ टक्के कर्जवसुली करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून कर्जमाफ होईल, या अपेक्षेने यंदा शेतकऱ्यांनी कर्जाच्या परतफेडीकडे पाठ फिरविल्याचे मानले जात आहे. असे असले तरी अद्याप शासनाकडून कर्जमाफीचे कोणतेही संकेत नाहीत.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वणी शाखेने सन २०१५-१६ या वर्षांत वणी तालुक्यातील सहा हजार ९६९ शेतकऱ्यांना ४३ कोटी ३५ लाख ४२ हजार रुपये पीक कर्जाचे वाटप केले होते. त्यांपैैकी ९१ टक्के कर्जवसुली झाली होती. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये पीक कर्ज घेणाऱ्या सभासदांची संख्या वाढली. सहा हजार ९६९ सभासदांहून ही संख्या सात हजार ७३९ एवढी झाली. या सभासदांना ५१ कोटी ४३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यांपैैकी मार्चअखेर ४१ कोटी ५२ लाख १० हजार रुपये कर्जवसुली करण्यात आली. त्याची टक्केवारी ८१ आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या वणी शाखेचे तालुका वसुली अधिकारी डी.बी.मोहितकर यांनी ‘लोकमत’ला ुदिली. वणी तालुक्यातील सुमारे ७० सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हे कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला शेतकरी
मागील हंगामात निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले. सुरूवातीला पाऊसच आला नाही. त्यामुळे कुणाला दुबार तर कुणाला तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मध्येच पुन्हा पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. हाती उत्पादन आले खरे; परंतु शेतमालाला अपेक्षित भावच मिळाला नाही. मागील वर्षी तुरीला १० हजार १२ हजारांपर्यंत भाव होता. यंदा मात्र तो खासगीत चार हजार ते चार हजार ४०० रुपये व नाफेडने पाच हजार ५० रुपये क्विंटलने खरेदी केला. मागील वर्षी सोयाबीनचा भाव तीन हजार ६०० ते तीन हजार ८०० रुपये होता. यंदा सोयाबीन केवळ दोन हजार ७५० ते दोन हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. त्यामुळे यंदा शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. त्याचाही परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे.