कापसाचे उत्पादन घटल्याने आणेवारी पुन्हा बदलणार
By admin | Published: November 14, 2015 02:40 AM2015-11-14T02:40:16+5:302015-11-14T02:40:16+5:30
जिल्ह्यात कापसाच्या उत्पादनात बरीच घट झाल्याचे दिसत आहे. कापसाचा वेचा अपेक्षेनुसार नाही.
आठ तालुक्यांच्या नजरा : अंतिम आणेवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा
यवतमाळ : जिल्ह्यात कापसाच्या उत्पादनात बरीच घट झाल्याचे दिसत आहे. कापसाचा वेचा अपेक्षेनुसार नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या अंतिम पीक आणेवारीत उर्वरित आठ पैकी किती तालुक्यांना बदलाचा दिलासा मिळतो, याकडे नजरा लागल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम दाखवून शासनाने नजर पीक आणेवारीत केवळ वणी तालुक्यातील दोन गावांची स्थिती गंभीर दाखविली होती. उर्वरित सर्व गावांमध्ये आलबेल असल्याचे चित्र निर्माण केले गेले. मात्र या चुकीच्या आणेवारी विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे तर सत्ताधारी भाजपा-सेनेनेही नाराजी व्यक्त केली. पीक काढण्याच्या पद्धतीबाबत आमदार मनोहरराव नाईक यांच्यासह पालकमंत्र्यांनीही असमाधान नोंदविले. त्यानंतर सुधारित पीक आणेवारी जाहीर केली गेली. त्यात १६ पैकी आठ तालुक्यात आणेवारी ५० टक्क्या पेक्षा कमी नोंदविली गेली. मात्र उर्वरित आठ तालुक्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र सारखा पाऊस झाला असताना कुठे आणेवारी कमी आणि कुठे जास्त का असा प्रश्न उपस्थित केला गेला. जेथे ५० टक्क्यापेक्षा जास्त आणेवारी दाखविली गेली तेथील पिकांची स्थितीसुद्धा बिकट आहे. कापसाचे अपेक्षित उत्पादन झालेले नाही. कोरडवाहू शेतकरी तर नुकसानीच्या खाईत लोटला गेल्याचे चित्र आहे. कापसाचा पहिलाच वेचा प्रभावित झाला. त्यात अपेक्षेनुसार उत्पादन झाले नाही. त्यामुळे या घटलेल्या कापूस उत्पादनाची दखल अंतिम पीक आणेवारी जाहीर करताना घेतली जाणार असल्याचे महसूल सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आठ पैकी आणखी काही तालुक्यांची पीक आणेवारी ५० पैशापेक्षा कमी नोंदविली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच या आठ तालुक्यातील जनतेच्या नजरा १५ डिसेंबरला जाहीर होणाऱ्या अंतिम पीक आणेवारीकडे लागल्या आहेत. कापूस उत्पादनाच्या आधारे कृषी व महसूलची यंत्रणा त्या आठ तालुक्यातील पीक आणेवारीचा फेरआढावा घेत असल्याचे सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)