डीएड झालेली मुलगी कसते शेती
By admin | Published: November 16, 2015 02:17 AM2015-11-16T02:17:35+5:302015-11-16T02:17:35+5:30
शेतकऱ्याच्या मुलीने शिक्षका होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण वडिलांच्या आत्महत्येने घराचाच आधार गेला.
शेतीच झाली शाळा : वडिलांच्या आत्महत्येनंतर सांभाळले घर
हरिओम बघेल आर्णी
शेतकऱ्याच्या मुलीने शिक्षका होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण वडिलांच्या आत्महत्येने घराचाच आधार गेला. स्वप्नांचा चुराडा झाला. मुलगी एकाकी झाली पण खचली नाही. डीएड झाल्यावरही नोकरीची आस न बाळगता तिने वडिलांची शेती सांभाळली. स्वत: घाम गाळून तिने वडिलांची शेती आज सुधारली आहे. रूपाली राजेंद्र चहांदे असे त्या धाडसी मुलीचे नाव.
तालुक्यातील केळझरा वरठी येथील शेतकरी राजेंद्र नथ्थुजी चहांदे (५०) यांनी २२ आॅक्टोबर २०१४ रोजी शेतातच सोयाबीनच्या गंजीशेजारी विष घेऊन आत्महत्या केली. नापिकी, कर्ज यामुळे ते विवंचनेत होते. त्यातच मुला-मुलीचे शिक्षण, अर्धवट राहिलेली विहीर, शासनाकडे रखडलेले पैसे अशा अनेक चिंता त्यांना छळत होत्या. त्यांच्या आत्महत्येला एक वर्ष उलटले. परंतु, या भागातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यापैकी कुणीही त्यांच्या कुटुंबीयांची दखल घेतली नाही. ही आत्महत्या शासन दरबारी ठरली, मात्र त्याचा आर्थिक लाभ अद्यापही या कुटुंबीयांच्या पदरी पडलेला नाही.
परंतु, राजेंद्रच्या आत्महत्येनंतर पत्नी, मुलगी, मुलगा गरिबीशी झुंजत आहे. मुलगी रूपाली ही मोठी. तिने डीएड केले. लहान भाऊ दहावीत शिकत होता.
रूपाली वडिलांच्या आत्महत्येनंतर चिंतेत होती. यातच आईला कॅन्सर झाला. कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, हा निर्धार रूपालीने केला. शेवटी शिक्षण सोडून शेतीच करायचा धाडसी निर्णय तिने घेतला. काहीही झाले तरी चालेल पण भावाचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे, हाच रूपालीचा प्रयत्न आहे. आजारी आईला घराच्या चिंतेने घेरू नये, यासाठी रूपालीची अहोरात्र धडपड सुरू आहे. रूपाली स्वत: बैलगाडी चालवत शेतात जाते. दिवसभर उन्हातान्हात शेतात राबते. तिच्या मेहनतीतून आज शेतीचीही अवस्था सुधारत आहे. आई आणि भावाला ही आपण पोरके नसल्याचे वाटू लागले आहे. भाऊ आता तालुक्याच्या ठिकाणी आयटीआय करत आहे. आईला कॅन्सर असताना शेती सांभाळून रूपाली तिची शुश्रूषा करते. पुढे तिला शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. आपल्या संघर्षाविषयी सांगताना रूपालीचे डोळे भरून येतात.
शिकलेली मुलगी असूनही रूपाली स्वत: शेती करत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रूपालीचे हे उदाहरण मार्गदर्शक आहे. आत्महत्या हा पर्याय नव्हे. माझ्या वडिलांनी केली. पण इतर कुणीही आत्महत्या करू नये, असे डबडबलेल्या डोळ्यांनी रूपाली सांगते. (शहर प्रतिनिधी)