पैनगंगा नदी तीरावरील गावात तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: July 20, 2014 12:11 AM2014-07-20T00:11:35+5:302014-07-20T00:11:35+5:30
उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी
उमरखेड (कुपटी) : उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंब स्थलांतरणाच्या तयारी आहे. हे भयावह चित्र तालुक्यात दिसत आहे. सर्वत्र कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा हाहाकार झाला आहे.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदी तीरावर जवळपास ५० गाव आहेत. या गावांना पावसाळ्यात पुराचा तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा चटका सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे आताही पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पात्रात जेमतेम पाणी होते तेही पूर्णपणे आटले आहे. जून महिना संपून जुलै संपण्याच्या मार्गावर आहे. तरी वरुण राजाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाऊस आलाच नाही. पावसाचे पाणी नसल्यामुळे नदी आटली. त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली आहे. या भागातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी आटले आहे. याचा परिणाम नदी तिरावरील गावातील पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. अनेक गावातील नळ योजना कुचकामी ठरली आहेत. पैनगंगा नदी तीराबरोबरच इतर गावातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जवळपास ७० गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे.
प्रशासनाने कृती आराखडा तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. पण त्यावर कायम उपाययोजना केली जात नाही. तालुक्यातील झाडगाव, तिवरंग, हातला, दिवटपिंप्री, पळशी, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, लोहरा, कारखेड, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, ब्राह्मणगाव, सोईट, ढाणकी, गाजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिरंजी, करंजी, बिटरगाव, भोजनगर, तरोडा, धनज, धानोरा, हरदडा, वांगी, बिटरगाव, बोथा (वन), चिल्ली या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट झाला आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने जलस्रोत संपुष्टात आले आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र रुप धारण करीत आहे. गावकऱ्यांसोबतच वन्य जीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पैनगंगा अभयारण्यात वनविभागाने पाणवठे निर्माण केले. पण त्यामध्ये पाणी नाही. त्यामुळे वन्यजीव गावकुसाकडे चाल करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच याचा परिणाम जवराळा येथील २० वर्षीय युवकावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. (वार्ताहर)