यवतमाळ जिल्ह्यातील रेणुकापूर वनक्षेत्रात काळविटाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 04:14 PM2020-05-15T16:14:06+5:302020-05-15T16:16:51+5:30
काळविटाची शिकार करुन मांसविक्री करणाऱ्या एकास यवतमाळ जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याजवळून मांस, तराजू, गंज, दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेणुकापूर वनक्षेत्रात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काळविटाची शिकार करुन मांसविक्री करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याजवळून मांस, तराजू, गंज, दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेणुकापूर वनक्षेत्रात करण्यात आली.
काळविटाची शिकार करुन मांस विक्री केली जात असल्याची माहिती नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांना मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. यानंतर वनविभागाचा ताफा जंगलात पोहोचला. तेथे मांस विकताना नमूना मिस्टिंग पवार (६५) याला अटक करण्यात आली.
घटनास्थळाहून काळविटाचे शिर, चामडी, शरीराचे इतर अवयव यासह तराजू, जर्मनचा गंज, दुचाकी (एमएच २९ बीएल ८४८७) आदी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्घ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई यवतमाळचे उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, उपविभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे, वनपाल आर.डी. जाधव, वनरक्षक सृष्टी राठोड, पी.पी. खत्री, अशोक कदम, सचिन देशमुख यांनी पार पाडली.
नेरमधील सलग दुसरी कारवाई
वन्यजीवांची शिकार प्रकरणी तालुक्यातील १५ दिवसातील ही सलग दुसरी कारवाई आहे. उत्तरवाढोणा येथे बिबट्याचे मांस व काळविटाचे शिंग जप्त करण्यात आले होते. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच काळविटाचे शिकार प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. नेर वनपरिक्षेत्रात बिबट, काळविट, ससा या वन्यजीवांच्या शिकारीत मोठी वाढ झाली आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.