पाण्यासाठी ‘सीओं’च्या खुर्चीला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 09:29 PM2019-04-02T21:29:49+5:302019-04-02T21:31:03+5:30
येथील प्रभाग दोन आणि चारमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. लोकांनी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडूनही दुर्लक्ष करण्यात आले. मंगळवारी या भागातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आपला राग व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : येथील प्रभाग दोन आणि चारमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. लोकांनी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडूनही दुर्लक्ष करण्यात आले. मंगळवारी या भागातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आपला राग व्यक्त केला.
शहराला नगरपरिषदेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. इतर भागात सुरळीत पाणीपुरवठा होत असताना प्रभाग दोन आणि चार यापासून वंचित राहात आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या या भागातील नळाला गेली अनेक दिवसांपासून पाणी येत नाही. उन्हाच्या झळा सोसत महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. वॉर्डाशी संबंधित नगरसेवक, नगराध्यक्षांकडे ही समस्या वारंवार मांडण्यात आली.
संतप्त महिलांनी मंगळवारी नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली. मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. वॉर्डाला तत्काळ पाणीपुरवठा न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यापूर्वी सदर भागातील महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले होते, हे विशेष.
निवेदन देताना लता मोरे, उषा आडे, संगीता जाधव, सुधा देशमुख, सूमन राठोड, आरिफा बेग, रजनी वानखडे, सुमित्रा भूसंगे, संध्या चौधरी, सुधा देशमुख, अनिता शिवरामवार, विद्या मेश्राम, अरुणा डोंगरे, संध्या टोम्पे, पद्मश्री गावंडे, रंजिता निळेवार, श्वेता पद्मावार, नलिनी देशमुख आदींची उपस्थिती होती. त्यांनी नगरपरिषदेच्या कारभाराविषयी तीव्र रोष व्यक्त केला.
कार्यालय अधीक्षकांवर कारवाईची मागणी
पाणीप्रश्न घेऊन नगरपरिषदेत दाखल झालेल्या महिलांना कार्यालयीन अधीक्षक एस.डी. बुरकुले यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक त्यांनी हा प्रकार केला, असा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.