मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:41+5:302021-04-10T04:39:41+5:30
उमरखेड/महागाव : जिल्ह्यात कारोना बळींचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा. त्यासाठी संशयितांची टेस्टींग करून ...
उमरखेड/महागाव : जिल्ह्यात कारोना बळींचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा. त्यासाठी संशयितांची टेस्टींग करून आणि लसीकरणावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला दिल्या.
कोविडचा प्रादुर्भाव आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी शुक्रवारी उमरखेड आणि महागावला भेट दिली. उमरखेड येथे त्यांनी जिल्ह्याला त्वरित कोरोनामुक्त करावयाचे असल्याने टेस्टिंग जास्तीत जास्त कराव्या व लसीकरणावर भर द्यावा, असे सांगितले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. उमरखेड उपविभागात त्यांची ही पहिलीच भेट होती. त्यांनी राजाराम प्रभाजी उत्तरवार रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. मरसूळ येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
विश्रामगृहात वृत्तपत्र वार्ताहर संघाच्यावतीने त्यांच्याकडे पत्रकार व कुटुंबियांचे लसीकरण करून देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार, डॉ.रमेश मांडन, तलाठी भउ ठाकरे आदी उपस्थित होते.
महागाव येथे तहसीलदारांच्या कक्षात विशेष बैठक घेऊन त्यांनी तपशिलवार माहिती घेतली. एसडीओ स्वप्नील कापडणीस, तहसीलदार नामदेव इसळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण, मुख्याधिकारी सुरज सूर्वे, गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड, ठाणेदार विलास चव्हाण यावेळी उपस्थित होते. त्यांनी डोअर टू डोअर जाऊन टेस्टींग वाढविण्याच्या सूचना दिल्या. महागावची लोकसंख्या पाहता नगरपंचायतीने दररोज एका प्रभागात कोविड तपासणी करावी, त्यातून निदान न झालेले रुग्ण सापडतील, असे स्पष्ट केले. जिल्हास्तरावर कोरोना चाचणीसाठी यंत्रणा वाढविण्यात आली असून २४ तासांत चाचणी अहवाल रुग्णास मिळेल. कोरोनाने एकही बळी जाऊ नये, याला प्राथमिकता देण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला केल्या.
बॉक्स
लसीचा एकही डोस वाया जाता कामा नये
महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा बारकाईने आढावा घेतला. लसीचा एकही डोस वाया जाऊ नये, यासाठी कटाक्षाने प्रयत्न करा, अशी सूचना त्यांनी दिली. लसीचे व्हायल ओपन केल्यानंतर संपूर्ण १० जणांचे लसीकरण झालेच पाहिजे. त्यातील एक डोसही वाया जाऊ नये, याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. महागाव तालुक्यात कोविडमुळे आजपर्यंत झालेले एकूण मृत्यू, सध्याचे ऍक्टिव्ह रुग्ण यांचाही त्यांनी आढावा घेतला.