पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी सदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:36 AM2020-07-14T10:36:15+5:302020-07-14T10:40:25+5:30
उपअधीक्षक पदावर बढती देण्याच्या दृष्टीने महासंचालक कार्यालयाने जारी केलेली पोलीस निरीक्षकांची निवड सूची (ग्रेडेशन) सदोष असल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर यादीत वरिष्ठ निरीक्षकांच्या आधी चक्क ५५ कनिष्ठ निरीक्षकांना स्थान देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उपअधीक्षक पदावर बढती देण्याच्या दृष्टीने महासंचालक कार्यालयाने जारी केलेली पोलीस निरीक्षकांची निवड सूची (ग्रेडेशन) सदोष असल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर यादीत वरिष्ठ निरीक्षकांच्या आधी चक्क ५५ कनिष्ठ निरीक्षकांना स्थान देण्यात आले आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाने २०१७ ला निरीक्षकांची ज्येष्ठता यादी जारी केली. नेमकी तशीच ज्येष्ठता यादी १ जानेवारी २०२० ला जारी करण्यात आली. या यादीत फारसा बदल नसल्याचे सांगितले जाते. या यादीतील काही पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले. तर काही ज्येष्ठांना डावलून मागे फेकण्यात आले. त्याऐवजी तब्बल ५५ कनिष्ठ निरीक्षकांना वरच्या जागेवर स्थान देण्यात आले. या सदोष यादीबाबत राज्यात निरीक्षकांमधून संताप व्यक्त होत आहे.
यादी निरीक्षकांपर्यंत पोहोचतच नाही
१ जानेवारीला जारी निरीक्षकांची ज्येष्ठता यादी घटक पोलीस प्रमुखांनी त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक होते. परंतु बहुतांश ठिकाणी ही यादी निरीक्षकांपर्यंत पोहोचविलीच जात नाही.
महासंचालकांकडे निवेदनांचा सपाटा
सहा महिन्यानंतर ही यादी बाहेर आली असून त्यातील उणिवा दृष्टीस पडत आहे. त्यामुळे अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी निरीक्षकांनी महासंचालक कार्यालयाकडे निवेदने पाठविण्याचा सपाटा लावला आहे. कनिष्ठ असूनही वरिष्ठांच्या आधी ज्येष्ठता यादीत स्थान मिळविलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये पिंपरी चिंचवड, हिंगोली, सोलापूर ग्रामीण, ठाणे शहर, नवी मुंबई, रायगड, नागपूर शहर, एसीबी, बृहन्मुंबई, पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ, औरंगाबाद शहर, नंदूरबार, लातूर, पुणे शहर, पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, अहमदनगर, सांगली, लोहमार्ग मुंबई, बुलडाणा, नागरी संरक्षण विभाग, यवतमाळ, नाशिक शहर, धुळे, एटीएस, सीआयडी पुणे, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
लिपिकवर्गीय यंत्रणेचा निष्काळजीपणा
ज्येष्ठ पोलीस निरीक्षकांना सध्या पोलीस उपअधीक्षक पदावरील बढतीचे वेध लागले आहे. पदोन्नतीची ही यादी जारी होण्याची शक्यता असतानाच निवड सूचीतील दोष पुढे आल्याने पदोन्नतीच्या वाटेवरील अनेक निरीक्षक अस्वस्थ आहेत. महासंचालक कार्यालयातील कक्ष अधिकारी व लिपिकवर्गीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे यादीत हा घोळ झाल्याचा पोलीस निरीक्षकांचा सूर आहे.
घटक प्रमुखांवर फोडतात खापर
महासंचालक कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रणा मात्र घटक पोलीस प्रमुखांवर खापर फोडताना दिसते. घटक प्रमुख अर्धवट माहिती पाठवितात, विलंबाने पाठवितात किंवा पाठवितच नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांची प्रकरणे खुली ठेवावी लागतात, पदोन्नती न मिळाल्यास हे अधिकारी ‘मॅट’मध्ये जातात आदी ठपका ठेवला जातो. दोष कुणाचाही असला तरी फटका मात्र निरीक्षकांना बसतो.
ही यादी तात्पुरती आहे. त्यावर आक्षेप मागविले गेले आहे. ते प्राप्त होताच सुधारणा करून अंतिम ज्येष्ठता यादी जारी केली जाईल. ही पदोन्नतीची यादी नसून ग्रेडेशन लिस्ट आहे. पोलीस निरीक्षक चुकीच्या दुरुस्तीसाठी अर्ज करू शकतात. लॉकडाऊनमुळे अंतिम यादी जारी झालेली नाही. परंतु सर्वांना आपल्या माहितीतील चुक दुरुस्तीची संधी दिली जाईल.
- राजेश प्रधान
पोलीस महानिरीक्षक (आस्थापना), मुंबई.