वणी तालुक्यात वनांचा ऱ्हास
By Admin | Published: August 22, 2016 01:04 AM2016-08-22T01:04:12+5:302016-08-22T01:04:12+5:30
तालुक्यातील वनांचा ऱ्हास करण्याचा सपाटा वाढत आहे़ तालुक्यातील वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात घटत आहे़
वन विभागाची उदासीनता : वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे वनसंपदा नामशेष
वणी : तालुक्यातील वनांचा ऱ्हास करण्याचा सपाटा वाढत आहे़ तालुक्यातील वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात घटत आहे़ ही बाब तालुक्यातील जनतेला भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते, असा निसर्गप्रेमींचा कयास आहे़ मात्र वन विभागाने याकडे अजूनही गांभीर्याने बघितल्याचे दिसत नाही़
अर्धशतकापूर्वी वणी तालुक्यात अनेक घनदाट जंगले होती़ त्यामध्ये शिंदोला, मेंढोली-बोरगाव, केसुर्ली-भालर, वनोजादेवी, रासा-घोन्सा, कायर-महाकालपूर, मालेगाव, पंचधार, चिलई येथील जंगले घनदाट मानली जात होती़ मात्र लाकडांचा जलतनासाठी होणारा उपयोग, शेती व इमारतीसाठी लाकडाचा वापर यासाठी सतत जंगलाची तोड होत गेली आणि जंगलांचे अस्तित्वच नष्ट होण्याची वेळ आली़ जंगलात विविध प्रकारचे प्राणी व पक्षांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती़ त्यांच्याही शिकारीत वाढ झाल्याने प्राणी, पक्षांची संख्याही नगण्यच राहिली़
राज्यातील वन संपत्तीच्या संरक्षणासाठी शासनाने स्वतंत्र वनखाते व यंत्रणा निर्माण केली. मात्र भ्रष्टाचाराच्या लोभात अडकल्याने ही यंत्रणाही कुचकामी ठरली़ चिलईच्या जंगलात मौल्यवान सागवान संपत्ती होती़ तेथे आता केवळ साग वृक्षांच्या झाडाची खुंटेच उभी दिसतात. जशी वन संपत्तीची वापरासाठी तोड झाली, तसे वृक्षारोपण व संवर्धन झाले असते, तर हा असमतोल काही प्रमाणात दूर होऊ शकला असता. वने उजाड झाल्याने या वनक्षेत्रावर अतिक्रमण करून त्याचे मोठ्या प्रमाणात शेतीत रूपांतर करण्याचा सपाटा सुरूच आहेत़ घनदाट वनांचे प्रथम झुडपी जंगलात रुपांतर झाले आहे. आता झुडपी जंगलांचे पठारात रूपांतर होऊ लागले आहे. जनतेला आता ‘रानमेवा’ मिळत नाही़ वन्यप्राण्यांना संचार करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही़ त्यामुळे वन्यप्राणी आता गावांकडे धाव घेत आहे. यामध्ये गावकरी व प्राण्यांचा अनाठायी जीव जात आहे. परिणामी पर्यावरण संतुलन ढासळत आहे़ ‘ग्लोबल वार्मींग’चे संकट हा त्याचा इशारा आहे़ पर्जन्यमानात घट झाली आहे़ ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव जनतेला येत आहे़ वणी परिसरात दगडी कोळशाच्या खाणींचा पसारा वाढला आहे़ त्यामुळे प्रदूषणातील वाढ शिगेला पोहोचली आहे़ वेकोलिला प्रकल्प मंजूर करताना मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे बंधन टाकले जाते़ मात्र एकदा प्रकल्पाला मंजुरात मिळाली की वेकोलि वृक्षारोपणाच्या उपक्रमाकडे दुर्लक्ष करते, असा अनुभव प्रदूषण नियंत्रण मंडळासह जनतेलाही आला आहे़ वाढत्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी जंगलक्षेत्रात वाढ होण्याची नितांत गरज आहे़ अन्यथा या भागातील नागररिकांचे आयुष्य धोक्यात येणार आहे. अन्नासोबतच आता पाणीही विकत घेण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे पाणी विक्रीचे गोरखधंदे जोरात सुरू झाले आहे़ इथपर्यंत मानवाला परवडणारे आहे़ मात्र ज्या दिवशी मानवाला ‘आॅक्सीजन’ विकत घ्यावा लागेल, त्यावेळी त्याची आयुष्यातील कमाईसुध्दा अपुरी पडणार आहे़ आॅक्सीजनचे नळकांडे पाठीवर घेऊन फिरण्याची वेळ येण्यापूर्वीच मानवाने वृक्षसंगोपणाचा विचार करणे गरजेचे आहे़ त्यासाठी वन विभागाला शस्त्रास्त्र पुरवून या विभागातील मनुष्यबळ वाढवून त्याला सक्षम बनविणे काळाची गरज झाले आहे़ अन्यथा घनदाट वन दिवसेंदिवस कमी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)