महिलेची भरपावसातच दुचाकीवर प्रसूती; यवतमाळातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 09:01 PM2020-09-23T21:01:13+5:302020-09-23T21:03:35+5:30
मुरझडी येथील २० वर्षीय गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी यवतमाळला आली. तपासणी केल्यानंतर गर्भ मृत असल्याचे समजले. खासगी स्त्री रुग्णालयात जात असतानाच दुचाकीवर प्रसवकळा सुरू झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील भोसा नाका परिसरात मंगळवारी दुपारी मृत अवस्थेतील अर्भक सापडले. या घटनेचा अवधूतवाडी पोलिसांनी शोध घेतला असता भीषण वास्तव पुढे आले.
मुरझडी येथील २० वर्षीय गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी यवतमाळला आली. तपासणी केल्यानंतर गर्भ मृत असल्याचे समजले. खासगी स्त्री रुग्णालयात जात असतानाच दुचाकीवर प्रसवकळा सुरू झाल्या. त्यातच दुपारी १.३० वाजता मुसळधार पाऊस होता. यात तो मृत गर्भ कधी बाहेर पडला हे समजलेच नाही. तिची रस्त्यावरच प्रसूती झाली. महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने गावी हलविले.
शासनाच्या अनेक योजना माता व बालमृत्यू थांबविण्यासाठी कार्यान्वित आहे. मात्र त्यानंतरही सर्वांपर्यंतच लाभ पोहोचेल अशी स्थिती नाही. मुरझडी येथील २० वर्षीय विवाहिता दीड वर्षातच गर्भवती राहिली. घरात आनंदाचे वातावरण होते. रोजमजुरी करणारे कुटुंब असूनही सुनेची देखभाल केली जात होती. आठ महिने पूर्ण झाल्याने २२ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी सुनेला घेऊन सासरे दुचाकीवर यवतमाळला आले.
येथील दत्त चौकातील सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केली. त्यात डॉक्टरने गर्भ मृत असल्याचे सांगितले. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला सोनोग्राफी तज्ज्ञाने दिला. दुचाकीवर सासरा व सून गावावरुन आले होते. डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकून हे दोघेही सुन्न झाले. भोसा मार्गावरील स्त्री रोग तज्ज्ञाकडे तपासणीला जायचे म्हणून दत्त चौकातून निघाले. तितक्यात दुपारी १.३० वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. कसेबसे भोसा नाका परिसरात पोहोचत नाही तोच त्या महिलेची दुचाकीवरच प्रसूती झाली. अवघडलेल्या अवस्थेत तिला असह्य कळा सुरू झाल्या.
सोबत असलेल्या सासऱ्यांना सांगण्याच्या आतच गर्भ बाहेर पडला. वरून जोरदार पाऊस असल्याने रस्त्यावरही कुणीच नव्हते. स्त्री रुग्णालयापासून काही मीटर अंतरावरच हे अघटित घडले. त्यानंतर महिला बेशुद्ध झाली. सासºयाने कसेबसे दुचाकीवरून आपले गाव गाठले.
पाऊस थांबताच मृतावस्थेतील अर्भक मुख्य रस्त्यावर पडलेले पाहून खळबळ उडाली. अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासातच या घटनेचा छडा लावला. नंतर त्यांची उलट तपासणी केली. यात अतिशय करुण कहाणी पुढे आली. अखेर ते अर्भक त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. शोध पथकातील सुधीर पिदूरकर व सहकाऱ्यांनी ही घटना उघड केली.
मुरझडीत झाले अंत्यसंस्कार
पहिलाच गर्भ मृतावस्थेत बाहेर आला. यामुळे हादरलेल्या त्या महिलेला पोलिसांनीही आधार दिला. नंतर त्या मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंबीयांनी दर्शविली. पोलिसांनी तो मृत अर्भक कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. बुधवारी त्याच्यावर मुरझडीत अंत्यसंस्कार झाले.