भारतीय सोयाबीनला इराणमधून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 02:25 PM2019-01-17T14:25:47+5:302019-01-17T14:28:05+5:30
भारतीय सोयाबीनला इराणमधून मागणी वाढली आहे. परिणामी सोयाबीनचे दर वधारले असून तूर्तास प्रती क्विंटल तीन हजार ६८० रुपयांचा भाव मिळत आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतीय सोयाबीनला इराणमधून मागणी वाढली आहे. परिणामी सोयाबीनचे दर वधारले असून तूर्तास प्रती क्विंटल तीन हजार ६८० रुपयांचा भाव मिळत आहे.
इराणकडून सोयाबीनची मागणी वाढताच राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनचे दर वधारले. त्यामुळे दर हमीदरापेक्षा प्रती क्विंटल २८० रूपयांनी जादा दर मिळत आहे. यावर्षी प्रारंभी चिनकडून भारतीय सोयापेंड खरेदीची मागणी आली. त्यामुळे सोयाबीनचे दर गतवर्षीच्या तुलनेत वाढले. दरम्यान, अमेरिकेने इराणावर निर्बंध लादले आहे. यामुळे इराणने कच्च्या तेलाच्या मोबदल्यात भारताकडून सोयापेंड, साखर आणि तांदूळ खरेदीसाठी होकार दिला. गेल्या काही दिसांपासून इराणनने भारताकडून सोयाबीन खरेदी सुरू केली. तसेच पशुखाद्यासाठी सोयापेंडची मागणी होत आहे. यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनचे दर हमीदराच्यावर गेले आह.
केंद्र शासनाने सोयाबीलना तीन हजार ३९९ रूपये प्रती क्विंटलचे दर जाहीर केले होते. प्रथम व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून दोन हजार ५०० ते दोन हजार ८०० रूपयांपर्यंत सोयाबीन खरेदी केले. त्याच सुमारास मोठ्या प्रमाणात खेडा खरेदी झाली. दिवाळीच्या सुमारास सोयाबीनचे दर वधारले अन् काही दिवसांतच पुन्हा ते घसरले. आता इराणने मागणी करताच सोयाबीनचे दर पुन्हा वधारले आहे.
सध्या अकोला जिल्ह्यातील कारंजा बजारपेठेत तीन हजार ६८० रूपयांपर्यंत सोयाबीनला प्रती क्विंटलचे दर मिळत आहे. यवतमाळच्या बाजारात तीन हजार ६२० रूपये दर मिळत आहे. अर्थात सोयाबीनचे दर क्विंटलमागे २८० रूपयांनी वधारले आहे.
दर वाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाच
सोयाबीनचे दर वधारले असले, तरी तयाचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन यापूर्वीच व्यापाऱ्यांना विकले आहे. त्यामुळे दर वधारल्याचा लाभ व्यापाऱ्यांनाच मिळणार आहे. केवळ दरवाढीच्या अपेक्षेने वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवणाऱ्या मोजक्याच शेतकऱ्यांना या दरवाढीचा लाभ होणार आहे.