यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे गंभीर रुग्ण वाढत असल्याने रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 05:02 PM2020-12-15T17:02:35+5:302020-12-15T17:03:56+5:30
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ऑक्टोबरपासून कमी होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्या अर्ध्यावरच आली. मात्र, गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ऑक्टोबरपासून कमी होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्या अर्ध्यावरच आली. मात्र, गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८५ रुग्ण उपचार घेत आहे. त्यापैकी ७४ रुग्ण गंभीर अवस्थेत आहे. चार जणांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, तर उर्वरित ७० जणांना ऑक्सिजन द्यावे लागत आहे. रेमडेसिवर हे इंजेक्शन उपचारात प्रभावी ठरत आहे. त्यामुळे त्याचा वापर सुरू आहे. मध्यंतरी गंभीर रुग्णसंख्या कमी झाल्याने या इंजेक्शनची मागणी केली नव्हती. आता नव्याने १३० इंजेक्शन लागतील, अशी मागणी करण्यात आली आहे.
रेमडेसिवर इंजेक्शनच्या वापराबाबत वरिष्ठ पातळीवर विविध वावड्या उठविण्यात आल्या होत्या. मात्र, त्याशिवाय प्रभावी औषध सध्या उपलब्ध नाही. रेमडेसिवरसोबत स्टेरॉईड असलेल्या औषधांचा वापर केला जातो. त्यातून सकारात्मक परिणामही दिसत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात या औषधाच्या वापरालाच डॉक्टरांची पसंती आहे. केवळ रुग्णसंख्या कमी झाल्याने मागणी थांबली होती. आता रुग्णसंख्या वाढत असून औषधांची मागणीही वाढली आहे. किमान दोन-तीन दिवसात त्या औषधांचे नियोजन केले जाणार आहे. इतर औषधीसाठा येथे पुरेसा आहे.
१५-२० इंजेक्शनची दररोज गरज
रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी काही काळ थांबविण्यात आली होती. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली होती. आता हळूहळू रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रेमडेसिवर इंजेक्शन पुरवठा करण्याची मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. त्याचा वापर अजूनही सुरू आहे.
टेस्ट, औषधी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध
जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी रॅपिड टेस्ट किट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ४५ हजार किट सध्या आहेत. त्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. प्रत्येक केंद्रावर ५० तपासणीचे उद्दिष्ट आहे.
आरटीपीसीआर तपासणीसाठी लागणारी व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया किट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय इतर औषधी साठाही जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे आहे. त्याशिवाय निविदा प्रक्रियाही केली आहे.
रेमडेसिवर या इंजेक्शनचा पुरेसा साठा आहे. आणखी १३० इंजेक्शनची मागणी केली आहे. यापूर्वी आरोग्य विभागाकडून एक हजार इंजेक्शन मिळाले होते. त्याशिवाय इतर आवश्यक औषधीही उपलब्ध असून अतिरिक्त औषधांसाठी मागणी केली आहे. लवकरच त्याचा पुरवठा होणार आहे. सध्या कुठलीच अडचण नाही.
- डॉ.मिलिंद कांबळे
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ